रविवारी रंगणार रंगकर्मींचा महोत्सव
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सप्तरंग थिएटर्सच्या वतीने साजरा होणाऱ्या सप्तरंग महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी शहरातील यश ग्रॅड हॉटेलच्या सभगृहात हा सोहळा रंगणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे यांनी दिली.
नवोदित नाट्य कलाकारांना प्रोत्साहन व त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी दर दोन वर्षांनी सप्तरंग थिएटर्सच्या वतीने सप्तरंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. संस्थेच्या वतीने अनेक कलाकार घडले असून, त्यांच्यासह अनेक ज्येष्ठ रंगकर्मी यांना या महोत्सवात निमंत्रित करुन कार्यशाळेचे आयोजन देखील केले जाते.
ज्ञानदेव पांडुळे ज्येष्ठ साहित्यिक असून, त्यांना नाट्य कलाक्षेत्राबद्दल आवड आहे. रयत शिक्षण संस्थेत जनरल बॉडी सदस्य म्हणून काम करताना नवोदित कलाकारांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन व आधार देण्याचे काम केले आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्य व कला क्षेत्रातील योगदानाबद्दल सप्तरंग महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी पांडुळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.