• Thu. Oct 16th, 2025

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन

ByMirror

Feb 18, 2025

18 आठवडे मिळाले विद्यार्थ्यांना तज्ञ विषय शिक्षकांचे मार्गदर्शन

रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांची शिक्षणातून उज्वल भवितव्याची पहाट उगवणार -बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी)

नगर (प्रतिनिधी)- रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांची शिक्षणातून उज्वल भवितव्याची पहाट उगवणार आहे. श्रमप्रतिष्ठा हे मूल्य सांभाळून रात्रशाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण कोणाची मक्तेदारी नसून, शिक्षणातून विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडविता येणार असल्याचा संदेश शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांनी दिली.


दिवसा अर्थार्जन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनिल सुसरे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे शिक्षणाधिकारी बुगे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य भाई सथ्था नाईट हायस्कूल करत आहे. रात्रशाळेत फक्त शिक्षण नव्हे तर जीवनाचे शिक्षण दिले जात असल्याचे सांगितले. तर मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व विशद करून, त्यांनी पुस्तकातून माणसे घडले जातात, यासाठी वाचनाचा अवलंब करण्याचे त्यांनी आवाहन केले.


प्रास्ताविकात डॉ. पारस कोठारी यांनी राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली नाईट स्कूल आहे. यामध्ये अर्धवट शिक्षण सोडलेले 632 विद्यार्थी प्रवेशित झालेले आहे. तर विशेष बाब म्हणजे 272 महिला व मुलींचा समावेश आहे. अद्यावत शिक्षण प्रणाली व तळमळीने शिकवणारे शिक्षकांच्या माध्यमातून नाईट स्कूलचे विद्यार्थी आपले भवितव्य घडवित आहे. एसएससी बोर्डात नाईट हायस्कूलच्या राज्याच्या गुणवत्ता यादीत भाई सथ्थाचे विद्यार्थी चमकले असल्याचे त्यांनी माहिती दिली.


जुबेर पठाण म्हणाले की, रात्रीच्या शाळेतून अर्धवट शाळा सोडलेल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. या संधीचे सोने करून अनेक विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडविले आहे. रात्रशाळेच्या माध्यमातून गरजू घटक शिक्षणाच्या प्रवाहात येत असल्याचे त्यांनी कौतुक केले.


प्राचार्य सुनिल सुसरे यांनी दर रविवारी विविध विषयाचे तज्ञ शिक्षक बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. मासूम संस्थेच्या सहकार्याने कॉपीमुक्त परीक्षेला सामोरे जाण्यासाठी 18 आठवडे तज्ञ मार्गदर्शक व्याख्यानमाला हा उपक्रम सुरू होता. विद्यार्थ्यांना नाष्टा, चहा व जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. या व्याख्यानमालेसाठी मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, संचालक कमलाकर माने, युवराज बोराडे, एसएससी प्रमुख शशिकांत गवस, गुरुप्रसाद पाटील, संदीप शेलार निलेश ठोंबरे यांचे सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
या व्याख्यानमालेत इंग्रजी विषयासाठी नितीन केने, रोहित सहानी, शरद पवार, विज्ञानासाठी वर्षा गुंडू, गणित विषयासाठी दीपक शिंदे, सुखदेव नागरे, समाज अभ्यासाठी गजेंद्र गाडगीळ यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाची सर्वस्वी जबाबदारी सांभाळणारे गजेंद्र गाडगीळ यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. आभार कैलास करांडे यांनी मानले. यावेळी नाईट हायस्कूलचे वरिष्ठ लिपिक अनिरुद्ध देशमुख, कर्मचारी मनोज कोंडेजकर, कैलास बालटे, अविनाश गवळी, सरस्वती नाईट हायस्कूलचे महेंद्र म्हसे, भुजबळ मामा व विद्यार्थी, भिंगार नाईट हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *