समाजहितासाठी महात्मा फुलेंच्या विचारांची मशाल सर्वांना पुढे घेऊन जावी लागणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांची 133 वी पुण्यतिथी फुले ब्रिगेडच्या वतीने समतेचा व फुलेंच्या विचारांचा संदेश देत साजरी करण्यात आली. माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फुले ब्रिगेडचे शहर प्रमुख दिपक खेडकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, किरण जावळे, किरण मेहेत्रे, गणेश जाधव, विक्रम बोरुडे, अमित खामकर, संकेत ताठे, किरण पंधडे, आशिष भगत, सागर गुंजाळ, आनंद पुंड, संतोष ढाकणे, डॉ. योगेश चिपाडे, रमेश बनकर, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, डॉ. रणजित सत्रे, जालिंदर बोरुडे, स्वाती सुडके, रेणुकाताई पुंड, संकेत लोंढे, गौरव कचरे, तुषार डागवाले, मयुर कुलथे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शिक्षणाचा पाया रोवून महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला सुसंस्कारी केले. महिलांपासून शिक्षणाची सुरुवात करून, त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत क्रांती घडविली. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास प्रारंभ करुन महाराष्ट्र व देशाला प्रेरणा दिली. सामाजिक कार्यातून त्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले. समाजहितासाठी त्यांनी प्रज्वलीत केलेली विचारांची मशाल सर्वांना पुढे घेऊन जावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिपक खेडकर म्हणाले की, फुले दांम्पत्यांनी सर्वच समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. दीनदुबळ्यांना आधार देऊन त्यांच्या उध्दारासाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचे शस्त्र सर्वसामान्यांना दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानून त्यांनी आधुनिक व क्रांतीकारी विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी केली. त्यांचे कार्य एका विशिष्ट समाजापुरते नव्हते. मात्र सध्या आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातीमध्ये फुट पडत चालली असून, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या विचाराने समाजाला पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.