• Fri. Feb 27th, 2026

तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त शहरात 1 मार्चला भव्य चित्रकला स्पर्धा

ByMirror

Feb 27, 2026

शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन


‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग’ हा स्पर्धेचा विषय

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधत शहरात 1 मार्च रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग या विषयावर आधारित ही स्पर्धा होणार असून, शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


शिवसेना (एकनाथ शिंदे) विभाग प्रमुख तथा महानुभाव पुजारी महासभेचे संघटन मंत्री आर्कि. प्रणव अशोकराव भोसले यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत महाराजांच्या जीवनातील प्रसंग साकारावेत, असे आवाहन आर्कि. प्रणव भोसले यांनी केले आहे.


गट 1: इयत्ता 1 ली ते 4 थी व गट 2: इयत्ता 5 वी ते 9 वी या दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे विजेते निवडले जाणार असून प्रत्येक गटातील स्पर्धकांना समान संधी देण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांसाठी अनुक्रम ₹1000/- , ₹700/- व ₹500/- रुपये रोख आणि मानपत्र, मानचिन्ह तसेच चतुर्थ क्रमांकाला मानपत्र व आकर्षक भेट वस्तू बक्षीस देण्यात येणार आहे.


स्पर्धेनंतर लगेचच परीक्षकांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. ही चित्रकला स्पर्धा रविवार, दि. 1 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता नगरकल्याण रोडवरील फॅमिली विश्‍व मॉल, उद्धव ॲकेडमी समोर आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे ठिकाण मध्यवर्ती असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेआधी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी 7498919574 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *