शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजीक विचारमंचच्या वतीने काळोखे यांच्या कार्याचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भानुदास काळोखे यांचा शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकताच फकिरा कादंबरी भेट देऊन सन्मान करण्यात आला.
पेमराज सारडा महाविद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात काळोखे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष सुनिल सकट, सावित्रीची लेक पुरस्कार प्राप्त उषाताई शिंदे यांच्यासह इतर मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक शिंदे म्हणाले की, चंद्रकांत काळोखे हे सामाजिक क्षेत्रातील झुंजार कार्यकर्ते आहेत. त्यांनी वंचित, मागास, उपेक्षित घटकांसाठी गेली अनेक वर्षे अविरतपणे कार्य केले आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा सामाजिक न्यायाचा विचार काळोखे यांच्या कार्यात ठळकपणे दिसून येतो. त्यांना मिळालेला पुरस्कार सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी स्फूर्तीदायक आहे. फकिरा कादंबरी म्हणजे सामाजिक संघर्ष आणि बदलाचं प्रतीक असून, हेच प्रतीक घेऊन काळोखे यांचा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुनील सकट म्हणाले की, आज समाजाला नव्या नेतृत्वाची गरज आहे. जे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालेल व समाजात परिवर्तन साधेल. काळोखे हे त्याच विचाराने समाजात कार्य करत आहे. फकिरा ही केवळ कादंबरी नाही, ती एक सामाजिक चळवळीची स्फूर्ती आहे. सामाजिक चळवळीला स्फुर्ती देण्यासाठी आणि त्यांना मिळालेल्या पुरस्काराचा अभिमान म्हणून त्यांचा हा सन्मान करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.