युवकांनी व्यसनमुक्त राहून व्यायामाकडे वळावे -बाळासाहेब जाधव
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील यात्रा उत्सवानिमित्त कुस्तीच्या मैदानात मानाची चांदीची गदा पटकाविणारे गावातील कुस्तीपटू पै. संदिप डोंगरे व पै. महेश शेळके यांचा सन्मान करण्यात आला. निमगाव वाघा विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच यावेळी कुस्ती मैदानात पै. आकाश डोंगरे याने देखील उत्कृष्ट कुस्ती केल्याबद्दल त्याचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव, उपसरपंच किरण जाधव, ग्रामपंचायत सदस्य तथा नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन जालिंदर आतकर, संचालक अतुल फलके, गोरख निमसे, अरुण कापसे, संपत कापसे, नामदेव फलके, बबन शेळके, गुलाब केदार, अशोक कापसे, मच्छिंद्र काळे, संभाजी पाचारणे, ज्ञानदेव जाधव, तुकाराम फलके, सुनिल कापसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव म्हणाले की, निमगाव वाघा गावाला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. ही परंपरा नव्या पिढीच्या माध्यमातून अधिक बळकट होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. युवकांनी व्यसनमुक्त राहून व्यायामाकडे वळले पाहिजे. समाजाचे आरोग्य आणि कुटुंबाचे भविष्य घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावाच्या मातीतून घडणारे मल्ल हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहेत. प्रत्येक यात्रा उत्सवामध्ये मल्लांना संधी देऊन त्यांचे मनोबल वाढवले जात आहे. याच प्रयत्नांतून आज गावातील मल्लांनी चांदीची गदा जिंकून गावाचे नाव उज्वल केले आहे. नव्या पिढीतील मल्लांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन व व्यायामशाळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.