जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात शिक्षक दिन साजरा
कर्णबधिर शाळेतील शिक्षकांचे काम खरोखरच वेगळे आणि प्रेरणादायी -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवून शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयातील शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव करण्यात आला. सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबरच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन समाजात एक चांगले नागरिक म्हणून घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
शहरातील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात झालेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. भालसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक विजय आरोटे, वृत्तपत्र छायाचित्रकार वाजिद शेख उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, कर्णबधिर शाळेतील शिक्षकांचे काम खरोखरच वेगळे आणि प्रेरणादायी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासात शाळेसह संस्थेची खूप मोलाची भूमिका आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन समाजाच्या प्रवाहात आणण्याचे खडतर काम येथील शिक्षक करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मदत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्याध्यापक विजय आरोटे यांनी सर्व समाजातील दिव्यांग विद्यार्थी या शाळेत शिकत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक दिव्यांग विद्यार्थी असलेली ही शाळा आहे. समाजाचा या शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. दिव्यांग विद्यार्थी हे समाजातील एक घटक असून, त्यांना प्रोत्साहनपर समाजाकडून वेळोवेळी मदत मिळणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असून, शिक्षण मोफत असले तरी इतर गरजा भागविण्यासाठी त्यांना पाठबळाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात कर्णबधिर या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचा मेडल व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यालयातील विशेष शिक्षक सहदेव करपे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची सोप्या भाषेत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक बाबासाहेब झावरे यांनी केले. आभार विशेष शिक्षक संजय राठोड यांनी मानले.
