साईबाबांच्या शिर्डी येथून अभियान सुरू करण्यासाठी वकील आणि सामाजिक कार्यकर्यांचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंगचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण मानव जातीची मदत घेऊन पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने जागतिक वृक्षाबंधन कार्यक्रम 2024 साईबाबांच्या शिर्डी येथून सुरू करण्यासाठी अनेक वकील आणि सामाजिक कार्यकर्यांनी पुढाकार घेतला आहे. या अभियानाद्वारे सिमेंटची जंगले कमी करुन निसर्गरुपी जंगलाला प्रोत्साहन व युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध थांबविण्यासाठीचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
गेल्या वीस वर्षापेक्षा जास्त काळ जगभर ग्लोबल वॉर्मिंगने प्रतिकूल परिणाम मानव जातीवर झाले आहेत. त्यातच जगभर आणि भारतात देखील शहरीकरण वाढत आहे. त्यातून सिमेंटची जंगले सुद्धा वाढत आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. संपूर्ण सजीव सृष्टीबरोबर मानव जात देखील यामुळे धोक्यात आलेली आहे. अशा वेळेस साईबाबांचा श्रद्धा व सबुरी हा संदेश घेऊन जागतिक वृक्षाबंधन कार्यक्रम 2024 सुरू करण्याबाबत अहमदनगर येथील वकीलांनी प्रयत्न सुरू ठेवले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतात शेकडो वर्षे रक्षाबंधन कार्यक्रम केला जातो. परंतु यापुढे पृथ्वी आपली आई आहे आणि संपूर्ण सृष्टी ही जगवण्याची आणि विस्तारित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे सर्व मानवजातीने या जागतिक वृक्षाबंधन कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे आणि हा कार्यक्रम साईबाबांच्या शिर्डी या पवित्र मायभूमीतून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
पारनेर तालुक्यातील कोरेगाव, माळकुप इत्यादी गावांमधून वृक्षाबंधन 2024 चा कार्यक्रम विचारमंचच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. भारताने युक्रेन विरुध्द रशिया या दीर्घकाळ सुरू असलेल्या लढा संपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पुढाकाराला भारतातील प्रत्येक नागरिकाने शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि त्याचा भाग म्हणून वृक्षाबंधन कार्यक्रम राबविला पाहिजे. पृथ्वी ही मानवासह सर्व सजीवांची माता आहे आणि तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्व मानव जातीवर आहे. त्यामुळे साईबाबांच्या माध्यमातून वृक्षाबंधन बाबत मोठ्या प्रमाणात जागृती केली जाणार असल्याचे ॲड. संतोष वाळूंज यांनी म्हंटले आहे.
या अभियानात शिर्डी संस्थानचा समावेश करण्यासाठी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्याकडेही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. या अभियानासाठी ॲड. कारभारी गवळी, ॲड. संतोष वाळुंज, ॲड. नरेश गुगळे, ॲड. शिवाजी शिरसाठ, ॲड. राजेश कावरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सब्बन, कैलास पठारे, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत.