मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संचलित उडान प्रकल्पातील स्वयंसेवकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, जिल्हाध्यक्ष सुर्यकांत नेटके, राज्य प्रसिध्दीप्रमुख संदीप कुलकर्णी, डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख, स्नेहालयाच्या मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम आदी उपस्थित होते.
विजयसिंह होलम म्हणाले की, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख फक्त पत्रकारांसाठी नव्हे, तर सामाजिक बांधिलकीने योगदान देत आहेत. स्नेहालयाच्या विविध सामाजिक प्रकल्पांना परिषदेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे. सामाजिक कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना त्यामध्ये सातत्य आवश्यक आहे. हे सातत्य जोपासून हातात घेतलेले कार्य सिध्दीस घेऊन जाण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. बागेश्री जरंडीकर म्हणाल्या की, स्नेहालयाच्या विविध सामाजिक उपक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे योगदान राहिले आहे. उडान प्रकल्पाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधात्मकतेसाठी कार्य सुरु असून, जिल्हाभर जागृती अभियान देखील चालविण्यात येत आहे. बालविवाहाची माहिती मिळताच प्रकल्पातील स्वयंसेवक प्रतिकूल परिस्थितीतही ते रोखण्यासाठी चोवीस तास तत्पर असतात. ऊन, पाऊस व वारा याची तमा न बाळगता कार्य सुरू आहे. पावसाळ्यात स्वयंसेवकांची गरज ओळखून त्यांच्या कार्याला दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उडान प्रकल्पातील स्वयंसेवक पावसाळ्यातही बालविवाह प्रतिबंधासाठी कार्यरत राहून मोटारसायकवर विविध ठिकाणी जात असतात. भर पावसात त्यांना भिजत जावे लागते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांच्यासाठी रेनकोटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मन्सूर शेख यांनी दिली. यावेळी उडानचे शाहीद शेख, अब्दुल खान, सिमा जुनी, शशिकांत शिंदे, पूजा झिने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप कुलकर्णी यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.