थॅलेसेमिया व रक्तदानाबाबत जनजागृती; सेवा सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश
जायंट्स उपेक्षित घटकांना आधार देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहे -संजय गुगळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजहिताचे कार्य अग्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या जायंट्स वेलफेअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त जनकल्याण रक्त केंद्र व जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जायंट्सचे सदस्य तसेच युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरात जायंट्सचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत, धर्मेंद्र सावनेर, अनिल गांधी यांच्यासह जनकल्याण रक्त केंद्राचे डॉ. विलास मढीकर उपस्थित होते.
यावेळी जनकल्याण रक्त केंद्राचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास मढीकर यांनी थॅलेसेमिया आजार, रक्तदानाचे महत्त्व तसेच रक्ताचे प्रकार, प्लाझ्मा, प्लेट्स व लाल पेशी या संदर्भातील माहिती उपस्थितांना दिली.
जायंट्सचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांनी सांगितले की, जायंट्स ही संस्था समाजातील उपेक्षित घटकांना आधार देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती या चळवळीत सहभागी होऊन सेवा कार्यात योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जायंट्सचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी जिल्ह्यात जायंट्स ग्रुप मार्फत सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. सेवा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, पांजरपोळ गोरक्षण संस्थेत जनावरांना चारा वाटप, जनावरांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप, अँटी रेबीज लसीकरण व जंतनाशक औषधांचे वितरण, महानुभाव संस्थेत भोजन तसेच प्राथमिक उपचार पेटी प्रदान अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
शिबिरासाठी सोनाली खांदरे, स्मिता बढे, डॉ. गुप्ता, गौरव पठारे व गजेंद्र सोनवणे यांचे सहकार्य लाभले. सचिव अमित मुनोत यांनी आभार मानले.