शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी वेधले लक्ष
शिक्षक आमदार दराडे यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- हजेरीपटावर व प्रत्यक्ष वर्गात हजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सन 2023-24 ची संचमान्यता करावी व काही कारणास्तव आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना संचमान्यतेतून वगळू नये, या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांना दिले.
आमदार दराडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बोडखे यांनी सदर प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. या प्रश्नावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी प्राथमिकचे रावसाहेब रोहोकले, प्राचार्य मिथुन डोंगरे, संभाजी पवार, देवीदास पालवे, महेश दरेकर, बडू मखरे, बाळासाहेब गांगर्डे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, वैभव सांगळे आदी उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2023-23 ची संचमान्यता केलेली आहे. या संच मान्यतेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहिलेल्या आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेने शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे सन 2023-24 ची ऑनलाइन संचमान्यतेमधील त्रुटीची दुरुस्ती होणे बाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी गटशिक्षणाधिकारी यांचे अहवालासह प्रस्ताव पाठवलेले आहेत. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
बऱ्याचशा शाळांमध्ये वरील संदर्भिय त्रुटी दुरूस्ती प्रस्तावा व्यतिरिक्त संचमान्यते बाबत त्रुटी आढळून आल्या आहेत . त्यांचीही दुरुस्ती होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे उर्वरित राहीलेल्या शाळांच्या संचमान्यता त्रुटीबाबत मागणी व्हावी. आधार अपडेशन नाही, परंतु वर्गात नियमित विद्यार्थी उपस्थिती आहे. गतवर्षी प्रमाणे सदर विद्यार्थी उपस्थिती बाबत क्षेत्रीय आधिकाऱ्या मार्फत खात्री करून तपासणी होवून संचमान्यतेत विद्यार्थी ग्राहय धरावेत. लहान मुलांचे ठसे उमटत नाहीत, काही शाळाबाहय मुलांचे जन्मप्रमाणपत्र उपलब्ध होत नाहीत अशा विद्यार्थ्यांना वयानुरूप (आरटीई ॲक्ट 2009 ) नुसार शाळेत प्रवेश दिला जातो. परंतु अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्याने संचमान्यतेत ग्राहय धरले जात नाहीत. अशा विद्यार्थ्यांची क्षेत्रियस्तरावरून पडताळणी करून त्यांनाही संचमान्यतेत ग्राहय धरून संचमान्यता होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सन 2023-24 च्या ऑनलाइन संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षक/शिक्षिकांचे समायोजन केले आहे, अशा शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत पुन्हा पदस्थापना देण्याचीही मागणी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून बाबासाहेब बोडखे यांनी केली आहे.
