‘रामचरितमानस’ आणि ‘भावार्थ रामायण’ या दोन ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यासातून सादर केला शोधनिबंध
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गायत्री मुंजाजी पांचाळ (गायत्री महेश क्षीरसागर) यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच आचार्य (पीएचडी) पदवी प्रदान केली आहे. गायत्री पांचाळ यांनी अत्यंत कठीण आणि अभ्यासपूर्ण संशोधनाद्वारे हे यश संपादन केले आहे.
त्यांनी हिंदी विषयात “रामचरितमानस एवं भावार्थ रामायण का तुलनात्मक अध्ययन” या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला. गोस्वामी तुलसीदास कृत ‘रामचरितमानस’ आणि संत एकनाथ महाराज कृत ‘भावार्थ रामायण’ या दोन महान ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनातून मांडला आहे.
त्या केडगाव येथील असून, पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयातील हिंदी संशोधन केंद्राच्या विद्यार्थिनी आहेत. महाविद्यालयाच्या हिंदी विभागाध्यक्षा डॉ. अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. गायत्री यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
