रामवाडीतील कचरा वेचक महिलांचा फेटे बांधून सन्मान
कचरा वेचक हा स्वच्छतेचा वारकरी -विकास उडानशिवे
नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडीत कचरा वेचक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत अहिल्यानगरच्या वतीने कचरा वेचक महिलांचा फेटे बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कचरा वेचक महिलांनी एकजुटीचा नारा देऊन, सरकारने कचरा वेचकांना पेन्शन लागू करावी, शासकीय योजनांचे फायदे द्यावे आणि आरोग्य सुविधा देण्याची मागणी केली.
कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत अहिल्यानगर शाखेचे समन्वयक विकास उडानशिवे यांच्या पुढाकाराने झालेल्या कचरा वेचक दिनानिमित्त विकास घाडगे, सनी चाखले, विकास वाल्हेकर, मयूर उडानशिवे, गणेश चकाले, कचरा वेचक महिला कालिंदीताई धाडगे, अलका काळुंखे, सिंधू साबळे, नंदा शेरकर, लक्ष्मी राजपूत, माया साळवे, इंदुबाई क्षीरसागर, इंदुबाई कांबळे, कमलबाई खुडे, मंदाबाई सोनवणे आदींसह कचरा वेचक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विकास उडानशिवे म्हणाले की, कचरा वेचक हा स्वच्छतेचा वारकरी आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी तो सातत्याने योगदान देत आहे. शहर हद्दीत 25 टक्के सुका कचरा हा कचरा वेचक जमा करुन पर्यावरण रक्षणाला देखील हातभार लावत आहे. प्लास्टिकचा शहरभर पसरलेला कचरा देखील उचलण्याचे काम हे कचरा वेचक करत आहे. ओला आणि सुका कचरा वेगळे करण्याचे काम देखील यांच्या माध्यमातून होत आहे. शासनाच्या माध्यमातून महापालिकेने त्यांच्या कामाची दखल घेऊन कचरा वेचकांना शासनाच्या सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले.
तर कोलंबिया या ठिकाणी एक हत्याकांड घडले होते. त्या ठिकाणी बायर्न्कविल विद्यापीठ मध्ये 11 कचरा वेचक कामगाराची निर्घृण हत्या करण्यात आली होती, या कामगारांच्या स्मृतीप्रित्यर्थ जगामध्ये कचरा वेचक दिवस साजरा केला जात असल्याची माहिती उडानशिवे यांनी दिली. कचरा वेचणाऱ्या महिला यावेळी डोक्यावर रंगेबीरंगी मानाचे फेटे बांधून झालेल्या सन्मानाने भारावल्या.