चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाकप व किसान सभेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
नगर (प्रतिनिधी)- चौंडी (ता. जामखेड) येथे मंगळवारी (दि. 6 मे) रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन देण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव ॲड. बन्सी सातपुते, ॲड. सुधीर टोकेकर, संतोष खोडदे, संजय नांगरे तसेच अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. बबनराव सालके, सेक्रेटरी आप्पासाहेब वाबळे व उपाध्यक्ष बापूराव राशिनकर यांनी ही माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या कर्जमाफी शक्य नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून निवेदन देणार आहे.
राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपये भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. या आणि अशा अनेक घोषणांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या घोषणांची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येणार आहे.