महाराष्ट्र राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने कुबडे यांच्या कार्याचा गौरव
सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक टिळक रोड येथील कॉम्रेड मधुकर कात्रे सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीत सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. निवृत्त कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यांचे हक्क व मागण्या याबाबत संघटनेने ठोस भूमिका मांडली.
या बैठकीत राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बलभीम कुबडे यांना पारनेर येथील गौरव उद्योग समूह कृषी व जनविकास प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार कॉम्रेड आनंदराव वायकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम संघटनेचे कार्याध्यक्ष अर्जुन बकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी डी. जी. अकोलकर, एस. एस. सय्यद, गोरख बेळगे, बाळासाहेब चव्हाण, अशोक क्षीरसागर, राजेंद्र माने, अण्णा आंधळे, येणारे, जवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉम्रेड आनंदराव वायकर म्हणाले की, एसटी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या प्रश्नांकडे कोणीही गांभीर्याने पाहत नव्हते. अशा कठीण परिस्थितीत बलभीम कुबडे यांनी संघटनेची भक्कम बांधणी करून संघटनेच्या माध्यमातून अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. त्यांच्या कार्यामुळे अनेक उपेक्षित कर्मचाऱ्यांना न्याय व हक्क मिळाला. कुबडे यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या निःस्वार्थ व सातत्यपूर्ण कार्याची पावती आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गंगाधर कोतकर यांनी संघटनेच्या सांगली येथे झालेल्या केंद्रीय बैठकीची माहिती दिली तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात अर्जुन बकरे यांनी बलभीम कुबडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कामाचे मनःपूर्वक कौतुक केले. संघटनेचे खजिनदार विठ्ठल देवकर यांनीही कुबडे यांना शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना बलभीम कुबडे म्हणाले की, संघटनेतील पद हे स्वतःसाठी नसून कामगारांच्या प्रश्नांसाठी वापरले पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर मिळणारा मोकळा वेळ समाजासाठी व कामगार हितासाठी निःस्वार्थपणे वापरला तर अनेक प्रश्न सुटू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आभार एकनाथ औटी यांनी मानले.
