• Thu. Apr 2nd, 2026

संतोष दसासे पाटील यांच्या पुढाकारातून शहरातील भाविकांना विनामूल्य तिरुपती बालाजी यात्रा

ByMirror

Aug 16, 2025

नगर रेल्वे स्थानकावरून 107 बालाजी भक्तांचा जत्था रवाना


25 वर्षांपासून सुरू असलेला भक्तीमय उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- कल्याण रोड परिसरातील बालाजी भक्त संतोष दसासे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून यंदाही भाविकांना विनामूल्य तिरुपती बालाजी तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन यात्रेला प्रारंभ झाला आहे. स्वातंत्र्य दिनी (दि. 15 ऑगस्ट) नगर रेल्वे स्थानकावरून 107 बालाजी भक्तांचा यात्रा रवाना झाला. ही यात्रा 20 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संपूर्ण प्रवास, मुक्काम, भोजन व दर्शन याची जबाबदारी आयोजकांनी विनामूल्य स्वीकारल्याने हा उपक्रम सर्व स्तरातील नागरिकांसाठी विशेष ठरत आहे.


यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. शिंदे म्हणाले की, धार्मिक व अध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी संतोष दसासे पाटील यांचे योगदान अनुकरणीय आहे. आजच्या युगात स्वखर्चाने शेकडो लोकांना दरवर्षी विनामूल्य यात्रा घडवून आणणे ही समाजात प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सन 1999 पासून संतोष दसासे पाटील आपल्या मित्रपरिवारासोबत हा धार्मिक उपक्रम सातत्याने राबवत आहेत. मागील 25 वर्षांत शेकडो भाविकांना त्यांनी विनामूल्य तिरुपती बालाजीचे दर्शन घडवून आणले आहे. या यात्रेत दरवर्षी सरासरी 107 भाविक सहभागी होत असून, हा उपक्रम आता नगर शहरातील धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे.


भाविकांच्या म्हणण्यानुसार, या यात्रेमुळे केवळ दर्शनच घडत नाही तर एकत्र प्रवास, सामूहिक भक्ती आणि आत्मिक समाधान यांचा अनुभवही मिळतो. अनेकांनी संतोष दसासे पाटील यांचे कौतुक करत हा उपक्रम म्हणजे आधुनिक काळातील तीर्थयात्रेची खरी व्याख्या असल्याचे मत व्यक्त केले.


यंदाच्या यात्रेत तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यामध्ये पारुनाथ ढोकळे, विनायक मच्चा, ओंकार शिंदे, अक्षय शिंदे, विजुभाऊ गाडळकर, नितिन लबडे, ॲड. नवनाथ नरसाळे, वसंत खोसे, रमेश गवळी, संतोष निमसे, ईश्‍वर नागवडे, भाऊसाहेब सोनवणे, विजय कांडेकर, शंकर राखोंडे, बबन खामकर, राजेंद्र कानडे, रोहिदास दातीर, भाऊसाहेब सैद, प्रशांत गांगर्डे, सखाराम मोटे, ताराचंद भणगे, दिगंबर आहेर, संतोष चौधरी, संतोष कोरडे, राजाराम काकडे, भानुदास सोनवणे, नामदेव गुंड, अशोक गांगर्डे, हिरामण गुंड, पांडुरंग देवकर, रमाकांत घिगे, परमेश्‍वर गोरे, कानिफनाथ शिंदे, अच्युत घुमरे, रुपचंद ढवळे यांच्यासह एकूण 107 भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत.


या उपक्रमाविषयी संतोष दसासे पाटील म्हणाले की, दरवर्षी ही यात्रा आयोजित करताना आम्हाला अपार समाधान मिळतो. बालाजी दर्शनातून भाविकांना मिळणारा आनंद हा आमच्यासाठी सर्वात मोठा समाधान आहे. ही सेवा पुढेही सातत्याने सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *