• Wed. Oct 15th, 2025

उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगावात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Feb 14, 2025

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यसनमुक्तीवर नागरिकांमध्ये जागृती

नगर (प्रतिनिधी)- उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथे मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक कल्याण योजने अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हाध्यक्ष शरद महापूर, उपाध्यक्ष, संदीपान कापडे, जिल्हाध्यक्ष दीपक कांबळे, उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे, सचिव वैशाली कुलकर्णी, डॉ. निखिल बोंबले, डॉ. अमेया शिंदे, डॉ. श्रद्धा सिर्सूलवार, मयुरी वेदपाठक, क्षितिजा टिक्कल, एकता भारताल, बिना उजागरे, सुप्रिया बेलोटे, काजल सहेर, शुभो शॉव आदी उपस्थित होते.


या शिबिराला यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजचे सहकार्य लाभले. यामध्ये नागरिकांची दंत तपासणी, मधुमेह, रक्तदाब आदी विविध तपासण्या करण्यात आल्या. डॉ. संतोष गिऱ्हे म्हणाले की, गरजू घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य शिबिर उपयुक्त ठरत आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना हॉस्पिटल मधील खर्चिक आरोग्य सुविधा घेणे परवडत नाही. भविष्यातील गंभीर आजाराचे धोके टाळण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी आवश्‍यक असून, यासाठी शिबिराचा लाभ घेण्याचे त्यांनी सांगितले.


या शिबाराप्रसंगी नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीची जागृती करण्यात आली. व्यसनांमुळे होणारे गंभीर आजार, त्याचे दुष्परिणामाची माहिती देऊन व्यसनापासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात आले. डॉ. निखिल बोंबले यांनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करुन व्यसनाने संसाराची व आयुष्याची राखरांगोळी होत असल्याचे सांगितले. या शिबिरासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिध्द सोलनकर, ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *