• Wed. Oct 15th, 2025

देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची होणार मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Sep 22, 2025

केडगाव नवरात्रोत्सवी भव्य आरोग्य शिबिर

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत उपक्रम; समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था व जय युवा अकॅडमीचा पुढाकार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त स्वस्थ नारी, सशक्त परिवार!, आरोग्य मोहिमेअंतर्गत केडगाव देवीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था, जय युवा अकॅडमीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समग्र परिवर्तनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे यांनी दिली.


24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत केडगाव देवी रोड एकता कॉलनी जवळ भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, उमंग फाउंडेशन, सूर्या मॉर्निंग ग्रुप, फिनिक्स फाउंडेशन या सामाजिक संस्थांचा देखील या उपक्रमात सहभाग राहणार आहे.


महिलांची आरोग्य तपासणी, रक्ताच्या विविध तपासण्या, निसर्गोपचार (आयुष), हाडांची तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर आदींसह विविध आजारांची तपासणी व उपचार मोफत केले जाणार असल्याचे जय युवाचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांनी सांगितले.


या भव्य आरोग्य उपक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे, मनपा आयुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष आदींसह डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. धनाजी बनसोडे, जालिंदर बोरुडे, राजकुमार चिंतामणी शहरातील विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केडगावला देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *