रक्तदान शिबिराला युवक-युवतींचा उत्सफूर्त प्रतिसाद
सावित्री ज्योती महोत्सवातील सामाजिक उपक्रम
महिलांनी सौंदर्यापेक्षा आरोग्याची काळजी घ्यावी -ॲड. सुरेश लगड
नगर (प्रतिनिधी)- सावित्री ज्योती महोत्सवात बचत गटातील महिला व कार्यक्रमास भेट देणाऱ्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात युवक-युवतींचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्राच्या युवा कल्याण योजनेअंतर्गत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जय युवा अकॅडमी, उडान फाउंडेशन, रयत प्रतिष्ठान, जीवन आधार प्रतिष्ठान, समर्पण बहुउद्देशीय संस्था, प्रगती फाउंडेशन, अहिल्या फाउंडेशन, मुंबादेवी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन विशेष जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, सुहासराव सोनवणे, संयोजक ॲड. महेश शिंदे, सुभाष जेजुरकर, आरती शिंदे, कांचन लद्दे, जयश्री शिंदे, बाबू काकडे, पोपट बनकर, कावेरी कैदके, अश्विनी वाघ आदींसह महिला बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होत्या.
ॲड. सुरेश लगड म्हणाले की, निरोगी आरोग्य असल्यास जीवनाचा खरा आनंद घेता येतो. महिलांनी कोणताही आजार अंगावर काढू नये, स्वत:ची काळजी घेतल्यास कुटुंबाची काळजी घेता येणार आहे. आरोग्यावर सौंदर्य टिकून आहे. यासाठी महिलांनी सौंदर्यापेक्षा आरोग्याची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. दरवर्षी महिला वर्गाला व नागरिकांना सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेची त्यांनी कौतुक केले.
ॲड. भूषण बऱ्हाटे म्हणाले की, महिला व नागरिकांसाठी सातत्याने सुरु असलेले हे शिबिर सर्वात मोठी सेवा आहे. वेळेवर आरोग्य तपासणी केल्यास भविष्यातील मोठ्या आजाराचा धोका टाळता येतो. शिबिराच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या तपासण्या जीवनाला नवसंजीवनी देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. महेश शिंदे यांनी प्रास्ताविकात दरवर्षी महिला व नागरिकांसाठी विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. कुटुंबात व कामात व्यस्त असलेल्या महिला वर्ग आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. काहींची आर्थिक परिस्थिती असताना वेळ अभावी तर काही आर्थिक परिस्थिती अभावी आरोग्याकडे दुर्लक्ष होते. या महोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जपण्याचे कार्य देखील केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात डॉ. दिलीप जोंधळे, डॉ. भास्कर रणनवरे, डॉ. किरण वैराळ, योगिता लांडगे, दिनेश लोंढे, डॉ. संतोष गिऱ्हे यांनी महिला व नागरिकांची आरोग्य तपासणी केली. या शिबिरासाठी इंडो आयरिश हॉस्पिटल, आनंद हॉस्पिटल, काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज, यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज, जिल्हा रुग्णालय यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड व अनिल साळवे यांनी केले. आभार दिनेश शिंदे यांनी मानले. या शिबिरासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला यांचे मार्गदर्शन लाभले.