उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी विभागाचा उपक्रम
सामाजिक बांधिलकीने वंचित व दुर्बल घटकांना आधार देण्याचा प्रयत्न करावा -संपत बारस्कर
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करुन, चित्रकलेसाठी त्यांना रंगाचे साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त टिळक रोड येथील जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संपत बारस्कार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी रंगाचे साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी विभाग शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सागर गुंजाळ, वकील विभाग अध्यक्ष ॲड. योगेश नेमाने, डॉक्टर विभागचे अध्यक्ष डॉ. रणजित सत्रे, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर, भिंगार अध्यक्ष संतोष हजारे, डॉ. अतुल मडावी, राष्ट्रवादी ओबीसी उपाध्यक्ष किरण मेहेत्रे, राष्ट्रवादी ओबीसी महासचिव शुभम आंबेकर, सरचिटणीस योगेश फुंदे, अजित चिपाडे, राम खांदवे, विकास खरात, राहुल शेळके आदींसह मूक बधिर विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले की, समाजासाठी योगदान देणारे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचा वाढदिवस आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहर व उपनगरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे. सामाजिक बांधिलकीने वंचित व दुर्बल घटकांना आधार देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
परमेश्वराने ज्यांना इतरांपेक्षा काही कमी दिले, त्यांच्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने काही तरी योगदान देण्याचे कार्य केले पाहिजे, असे सांगितले. तर भाषा-भाषेत वाद निर्माण होत असताना, मूकबधिर विद्यार्थ्यांना एका वेगळ्या सांकेतिक भाषेत शिकवणाऱ्या शिक्षकांचे कार्य कौतुकस्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमित खामकर म्हणाले की, मूकबधिर विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला-गुण असून, त्यांना चित्रकलेसाठी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून रंग भरण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये दातांचे विकार वाढत असताना, या विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्याच्या दृष्टीकोनाने हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. रणजीत सत्रे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य संदर्भात मार्गदर्शन करुन निरोगी आरोग्यासाठी व्यायाम व आहारचे महत्त्व विशद केले. त्याचप्रमाणे दातांची निगा राखण्याचे आवाहन केले. विशेष शिक्षक अर्चना देशमुख यांनी दंत आरोग्यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. डॉ. अतुल मडावी यांनी सर्व विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. पाहुण्यांचे स्वागत सुदाम चौधरी यांनी केले. चित्रकलेसाठी मिळालेल्या रंगाच्या साहित्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.बी. वालझाडे यांनी केले. विद्यालयाच्या वतीने बाबासाहेब झावरे यांनी आभार मानले.