• Wed. Feb 25th, 2026

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालकांची मोफत तपासणी

ByMirror

Jul 20, 2024

आर्थिक दुर्बल घटकांमध्ये सदृढ आरोग्याची मुहूर्तमेढ आनंदऋषीजी हॉस्पिटलने रोवली -कांचनबाई अच्छा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकांमध्ये सदृढ आरोग्याची मुहूर्तमेढ आनंदऋषीजी हॉस्पिटलने रोवली. उत्तमप्रकारे आरोग्य सेवा देऊन या आरोग्य मंदिरात माणुसकीचे कार्य घडत आहे. नफा नसला तरी चालेल, मात्र सर्वांचे आरोग्य जपण्याचे कार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु आहे. यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी सज्ज असून, सर्व संचालक सेवाभावाने योगदान देत असल्याची भावना कांचनबाई अच्छा यांनी व्यक्त केली.


जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व. रसिकलाल निलाचंद अच्छा यांच्या स्मरणार्थ अच्छा परिवाराच्या वतीने मोफत बालरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन कांचनबाई अच्छा यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रशांत अच्छा, वैभव अच्छा, शुभम अच्छा, आयुष अच्छा, वैशाली अच्छा, सुजाता अच्छा, रितू अच्छा, कणक अच्छा, मनोज कुंकुलोळ, संतोष बोथरा, सतीश (बाबूशेठ) लोढा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, डॉ. श्रेयस सुरपुरे, डॉ. रुपेश सिकची, डॉ. सोनाली कणसे, डॉ. वैभवी वंजारे आदी आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, मोठ्या शहराच्या धर्तीवर शहरातील बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी सुसज्ज बालकांचे एनआयसीयू सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहे. कमी वजनाने जन्मलेल्या बालकांना सुदृढ करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेसाठी अच्छा परिवराने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. संस्कृत व धार्मिक असलेल्या या परिवाराचे सातत्याने सामाजिक कार्यात योगदान मिळत आहे. वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीसाठी देखील अच्छा परिवाराचे मोठे आर्थिक योगदान लाभले आहे. यावर्षी लवकरच नर्सिंग कोर्स सुरू केले जाणार असून, इंग्लिश मीडियम स्कूलचे डिसेंबर मध्ये ऍडमिशन सुरू होणार आहे. पुढील भविष्यात शिक्षणाचे युग असून, त्या दृष्टिकोनाने अद्यावत शिक्षणाचा पाया रचण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. श्रेयस सुरपुरे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत एनआयसीयू सेंटर कार्यान्वीत असून, अल्पदरात सेवा दिली जात आहे. नवजात बालकांना ना नफा, ना तोटा या तत्त्वावर सर्व प्रकारचे लसीकरण उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमध्ये तज्ञ बाल शल्यचिकित्सक उपलब्ध असल्याची त्यांनी माहिती दिली. तर पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुन्या यांसारख्या साथीचे आजारांवर उपचारासाठी हॉस्पिटलची यंत्रणा सज्ज असून, शहरात दाखल झालेला झिका व्हायरस रोखण्यासाठी परिस्थिती हाताळली जात आहे. हे साथीचे आजार टाळण्यासाठी परिसराची स्वच्छता ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.


डॉ. रुपेश सिकची म्हणाले की, जन्मलेल्या नवजात बालकापासून ते अठरा वर्षे पर्यंतच्या बालकांच्या आरोग्याच्या सर्व सेवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. तर बालकांवर विविध अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी केल्या जात आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया मोफत होत असून, योजनेत न बसणाऱ्या शस्त्रक्रिया देखील अल्पदरात होत आहे. दर शनिवारी मोफत ओपीडी सेवा दिली जात असून, दर महिन्याला होणाऱ्या बालरोग तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या शिबिरात 90 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार सतीश (बाबूशेठ) लोढा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *