मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
विस्कळीत वीज पुरवठा आणि गैरवाजवी वीज बिलाची तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. यात वीज नियमित आणि सुरळीत पुरवठा हा मोठा प्रश्न असून, शेती वीज ग्राहकांना यात नाहक अतिरिक्त वीजबिल भरणा करावा लागत असल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे संतप्त झाले आहेत. या बाबत त्यांनी जिल्ह्यातील विस्कळीत वीज पुरवठा आणि गैरवाजवी वीज बिलाची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.
जिल्ह्याच्या उत्तरेकडे असलेले धरण, नदी आणि पाटांनी वाहणारे पाणी ही मोठी देणगी असली, तरी विजेचा लपंडाव, रात्रीची वीज, त्यामुळे श्वापदांची भीती, बिघडलेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी करावी लागणारी स्थानिकांना वर्गणी, भारनियमन असे वीज वितरंणाचे वाभाडेच खासदार वाकचौरे यांनी काढले. यात तातडीने सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबतचे लेखी पत्र खासदार वाकचौरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वीज वितरणच्या कार्यकारी संचालकांना पाठवले आहे. खरिपात पडलेला अत्यल्प पाऊस आणि त्यामुळे रब्बीचे पीक धोक्यात असताना पाटपाण्याद्वारे मिळणारे पाणीही विजे अभावी वाया जाणार असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा लागेल असे वाकचौरे यांनी स्पष्ट केले आहे.

नगर-नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून 5 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडले जाणार आहे. जलसंपदाच्या या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले गेले असून, या प्रश्नावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष समोर येत आहे. अशात खरीप वाया गेल्याने आणि रब्बीला केवळ धरणातील पाण्यांवर नगर जिल्ह्यातील शेतकरी अवलंबून असताना खंडित आणि आणि केवळ रात्रीचा वीज पुरवठा, ट्रान्सफॉर्मर बिघाड आदी कारणे समोर येत असल्याने खासदार वाकचौरे संतप्त झाले आहेत.
खंडित वीज पुरवठ्या सोबतच वीज देयकामधे व्याजाची आकारणी हि 22 टक्के होत असल्याने शेतकरी वर्गावर होणारा, मोठा अन्याय, वीज देयकातील इतर अकारणी मुळे वीज देयकाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढणे यावर वाकचौरे यांनी आक्षेप घेतला असून या तफावरी दूर करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यास प्रत्यक्ष्यात फक्त 6 ते 8 तास वीज पुरविली जाते. मात्र विजेच्या देयकाची आकारणी हि 24 तांसाची केली जाते. त्या मुळे शेतकरी जेवढी वीज वापरतो किंवा वीज पुरवली जाते. तेवढेच विजेचे देयक शेतकरी यास मिळणे आवश्यक असल्याचे वाकचौरे यांनी निवेदनात म्हंटले आहे. ग्रामीण भागात जंगली श्वापद यांचा वावर आसल्याने शेतकऱ्यांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे भीतीपोटी रात्रीचे वेळी शेतीला पाणी देता येत नाही. हि वस्तुस्थिती असून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा केला जावा आणि शेती वीज वाहिनीना दुरुस्त झाल्यास त्याची देखभाल दुरुस्तीसाठी त्या वाहिनी वरील शेतकरी वर्गाला वर्गणी गोळा करावी लागते, हि अनिष्ट प्रथा बंद होऊन विज वितरण कंपनी मार्फत दुरुस्ती केली जावी अशा मागण्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी केल्या आहेत.