• Wed. Oct 15th, 2025

मार्च 2024 अखेरच्या पीएफ पावत्यांसाठी शिक्षक परिषदेचा पाठपुरावा

ByMirror

May 20, 2025

विशेष कॅम्पद्वारे पावत्या वितरणाची मागणी

तोडगा निघाला नाही, तर आंदोलनाचा आक्रमक पवित्रा -बाबासाहेब बोडखे

नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भातील पावत्या मार्च 2024 अखेरपर्यंत अद्याप उपलब्ध न झाल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर पावत्या तात्काळ ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने देण्यात याव्यात, यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याची मागणी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.


या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी, प्राचार्य संभाजी पवार, एस.एल. शिरसाठ, सुदाम दळवी, अभिजीत गवारे, बाळू दुधाडे, सुजय सजलानी, बापू दुधाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. मात्र, जर अद्यापही तोडगा निघाला नाही, तर शिक्षक परिषद आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेइल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


जिल्ह्यातील शाळांना 2021-2022 पर्यंतच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या प्राप्त झाल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते विशेष कॅम्पच्या माध्यमातून ऑनलाईन अपडेटही करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर आजतागायत कुठल्याही कर्मचाऱ्याला पुढील पावत्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचारी आपल्या पीएफ खात्यातून कर्ज काढू इच्छित असताना, केवळ 2021-22 पर्यंतच शिल्लक रकमेवर आधारित कर्ज मंजूर केले जात आहे. परिणामी, पुढील दोन वर्षांचा हिशोब न धरल्याने कर्मचारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.


फक्त पावत्याच नव्हे तर, जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या पुरवणी देयकांचा, वैद्यकीय खर्चाच्या देयकांचा तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजारोखीरकरणाच्या देयकांचा विलंबाच्या प्रश्‍नावर शिक्षक परिषदेने लक्ष वेधले. ही सर्व देयके तातडीने वितरित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *