सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका
नगर (प्रतिनिधी)- मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तिचा पती व अन्य नातेवाईकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ही सुनावणी श्रीगोंदा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्या न्यायालयात पार पडली.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळी येथील रंजना अरुण पालेकर यांची मुलगी अर्चना हिचा विवाह शैनेश्वर मच्छिंद्र नवले याच्याशी झाला होता. सासरी नांदत असताना अर्चनाने शैनेश्वर नवले, मीराबाई नवले, माणिक तुळशीराम नवले, सरस्वती माणिक नवले व सोनाली अतुल पिसाळ या आरोपींवर मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या आईला फोन करून याची माहिती दिली होती. त्यामुळे अर्चनाची आई रंजना पालेकर यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भादंवि कलम 306, 498अ, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, सुनावणी दरम्यान आरोपींविरुद्ध कोणताही ठोस व सबळ पुरावा सादर करण्यात आला नाही. आरोपीचे वकील ॲड. आकाश राजेश कावरे यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची सदर गुन्ह्यातून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्ततेचे आदेश दिले आहेत. आरोपीच्या वतीने ॲड. आकाश राजेश कावरे, ॲड. भाऊसाहेब पालवे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. राहुल मते व ॲड. राजेश कावरे यांनी सहाय्य केले.