स्पर्धेसाठी खेळाडू पुण्याला रवाना
दिव्यांग जलतरणपटू अभिजित माने याची पॉवर लिफ्टिंगसाठी निवड
नगर (प्रतिनिधी)- स्पेशल ऑलिम्पिक भारत-महाराष्ट्र आयोजित स्टेट सिलेक्शन चॅम्पियनशिप स्विमिंग व पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पाच दिव्यांग खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा बाल कल्याण संस्था पुणे येथे होत असून, पोहण्याची निवड चाचणी एस.पी. कॉलेज टिळक रोड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी शुक्रवारी (दि.25 जुलै) खेळाडू शहरातून रवाना झाले आहेत.
या पाचही दिव्यांग खेळाडूंना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे प्रशिक्षण व स्पोर्ट्स थेरेपी सराव तज्ञ प्रशिक्षकांकडून करून घेण्यात आहे आहेत. या स्पर्धेसाठी मतिमंद मुलांचे बालगृह पाथर्डी येथील खेळाडू चि. बाबू, जलतरण स्पर्धेसाठी दिपक पावरा, कृष्णा व रज्जाक गोच्चू आणि पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी अभिजित माने यांचा समावेश आहे. अभिजित माने हा दिव्यांग गटातील उत्कृष्ट जलतरणपटू असून, यावर्षी त्याने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. प्रशिक्षक म्हणून संदीप रहाणे काम पाहत आहे.
या स्पर्धेसाठी दिव्यांग मुलांना स्पेशल ऑलिम्पिक भारत-महाराष्ट्रचे अध्यक्ष धनश्रीताई सुजय विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या दिव्यांग खेळाडूंना घडविण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी धनश्रीताई विखे पाटील विशेष योगदान देत आहेत.