अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर 15 दिवस रंगणार फुटबॉलचा थरार; स्पर्धेचे सातवे वर्ष
स्पर्धेतून स्वत:ला सिध्द करता येते -नरेंद्र फिरोदिया
पहिल्याच दिवशी प्रवरा पब्लिक स्कूलचे मुला-मुलींचे संघ विजय
नगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 2025 चे सोमवार (दि.25 ऑगस्ट) पासून प्रारंभ झाले. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला असून, यामध्ये 47 शालेय मुला-मुलींच्या संघाचा समावेश आहे. 15 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 100 पेक्षा अधिक सामने रंगणार आहेत. या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या हस्ते मैदान पूजन आणि आकाशात फुगे सोडून व फुटबॉलला किक मारुन करण्यात आले. यावेळी फिरोदिया शिवाजीयन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव राजू पाटोळे, प्रदीप जाधव, उपाध्यक्ष खालिद सय्यद, राणासिंह परमार, जोगासिंह मिनहास, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहखजिनदार रणबीरसिंह परमार, विक्टर जोसेफ, अहमदनगर महाविद्यालयाचे क्रीड विभाग प्रमुख डॉ. सॅवियो वेगास, कोअर कमिटी सदस्य जेव्हिअर स्वामी, राजेश ॲंथनी, सचिन पठारे, राजेंद्र पाटोळे, पल्लवी सैंदाणे, श्रेया सागडे, अभिषेक सोनवणे आदींसह प्रशिक्षक, पंच व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, शहरात फिरोदिया शिवाजीयन्सने फुटबॉल खेळ रुजवून यामधील उत्कृष्ट खेळाडूंसह प्रशिक्षक व पंच देखील घडविण्याचे काम केले आहे. फुटबॉल प्रशिक्षण व स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. शहरात फुटबॉल हा मुख्य खेळ बनला असून, स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह दिसून येत आहे. या स्पर्धेत 47 संघांचा रेकॉर्ड ब्रेक सहभाग लाभला आहे. हारणे-जिंकणे हा स्पर्धेचा भाग असून, स्पर्धेतून स्वत:ला सिध्द करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले की, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या पाठबळाने शहरात फुटबॉल खेळाला चालना मिळाली आहे. सलग 7 वर्षे ही स्पर्धा घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात आले आहे. स्पर्धेचा अनुभव खेळाडूंसाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज वाळवेकर यांनी फिरोदिया शिवाजीयन्सच्या माध्यमातून फुटबॉल खेळाडू घडविण्याचे काम केले जात आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देऊन शहरात फुटबॉल वाढविण्याचे काम सुरु असून, शहरातील खेळाडूंनी विविध स्पर्धेत मिळवलेल्या यशातून गुणात्मक प्रगतीचा आलेख सर्वांपुढे असल्याचे ते म्हणाले.
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 15 दिवस रंगणार आहे. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील एकूण 47 शालेय संघानी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये 9 मुलींचे संघ आहेत. ही स्पर्धा 12, 14 व 16 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये होणार आहे. तर 17 वर्षा खालील मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया तिवारी यांनी केले. या स्पर्धेसाठी दरवर्षी मैदान उपलब्ध करुन देत असल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे आभार मानण्यात आले.
उद्घाटन सत्रानंतर पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलच्या मुला-मुलींच्या संघाने विजय मिळवला. प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द ऊर्जा गुरुकुल या 17 वर्षा आतील मुलींच्या संघात प्रवरा पब्लिक स्कूलने दमदार खेळी करुन 4-0 गोलने विजय मिळवला. मुलांच्या 14 वर्षे वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूलने 6-0 गोलने पोदार इंटरनॅशनल स्कूलचा पराभव केला. 12 वर्षे वयोगटातील प्रवरा पब्लिक स्कूलच्या संघाने 6-0 गोलने ऊर्जा गुरुकुल संघावर मात केली. तर संध्याकाळी झालेल्या 16 वर्ष वगोगटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द ऊर्जा गुरुकुल मध्ये अटातटीचा सामना रंगला होता. यामध्ये देखील प्रवरा पब्लिक स्कूलने 2-0 ने विजय संपादन केले.