रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
कारवाईसाठी संबंधित विभागांना लेखी पत्र
नगर (प्रतिनिधी)- चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेच्या जामखेड तालुक्यातील साकत येथे एकाच इमारतीत नर्सिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक कॉलेज चालवले जात आहे. तर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटणे, कागदोपत्री शिक्षक दाखवून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषणात विवेक भिंगारदिवे, गणेश कदम, अविनाश भोसले, कृपाल भिंगारदिवे, माजी नगरसेवक राहुल कांबळे, आरतीताई बडेकर, शिवाजी साळवे, माया जाधव, सारिका गांगुर्डे, सतीश साळवे, जयराम आंग्रे, सुनील कदम, यशराज शिंदे, रितेश क्षीरसागर, मुकेश नंदिरे, उत्कर्ष भालेराव, आदर्श साळवे, अभिजीत साळवे, पप्पू क्षीरसागर, राज साळवे, सुदाम भिंगारदिवे, संग्राम साळवे, संग्राम नंदिटे, भास्कर रणनवरे, बाळू भिंगारदिवे आदींसह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेमार्फत साकत (ता. जामखेड) येथे एकाच इमारतीमध्ये नर्सिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक महाविद्यालय चालविले जाते. एकच इमारत व तीच जमीन दाखवून महाविद्यालयाला मंजुरी मिळवताना खोटे व बनावट कागदपत्र तसेच कागदोपत्री कर्मचारी दाखवून तपासणी कमिटीला मोठ्या प्रमाणावर लाच देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आलेला आहे.
एकाच इमारतीत वेगवेगळ्या कॉलेजला मंजुरी मिळविलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना फक्त कागदोपत्री प्रवेश देऊन त्यांची शिष्यवृत्ती लाटण्याचे काम या महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. एकही प्राध्यापक उपलब्ध नसून फक्त कॉलेज तपासणीच्या वेळी कागदोपत्री प्राध्यापक दाखविले जातात. संस्थेमार्फत एकाच इमारतीत ए.एन.एम./जी.एन.एम., बीएससी नर्सिंग, डी फार्मसी तसेच पॉलिटेक्निक कॉलेज चालवले जात असून, शासनाच्या विद्यापीठाचे नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केलेले आहे.
महाविद्यालयाला लागणारा कर्मचारी वर्ग हा कागदोपत्री आहे. प्रत्येक कॉलेजसाठी दाखविलेले प्राचार्य सुद्धा त्या पदासाठी पात्र नसून, खोटे व बनावट कागदपत्र प्रतिज्ञापत्र तयार करून वेगवेगळ्या तपासणी समित्यांना मोठ्या प्रमाणावर लाच देऊन शासनाची फसवणूक केलेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व कॉलेजच्या एकाच दिवशी संबंधित विद्यापीठा मार्फत तपासण्या करून, कॉलेज व संस्थेचे विश्वस्त यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, शैक्षणिक वर्ष 2025-26 चे प्रवेश प्रक्रियेत संस्थेत कोणत्याही अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येऊ नये, मागील शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे तात्काळ इतर कॉलेजला समायोजन करून स्थलांतर करावे व तालुका न्यायदंडाधिकारी म्हणून सदर कॉलेजला ताब्यात घेऊन सर्व कॉलेजची एकाच दिवशी संबंधित विद्यापीठा मार्फत तपासणी करण्याचे आदेश देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आलेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने योग्य त्या उचित कारवाईसाठी पाठविण्यात आल्याचे लेखी पत्र जिल्हा दंडाधिकारी यांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.