• Wed. Oct 15th, 2025

जिजाऊ जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर महिलेचे नगर तहसिल कार्यालया समोर उपोषण

ByMirror

Jan 13, 2025

स्वत:च्या जागेवर बेकायदेशीरपणे लावलेले त्या व्यक्तीचे नाव हटवून स्वत:चे नाव लावण्याची मागणी

माहिती अधिकार कार्यकर्त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन जागेवर नाव लावल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- मौजे चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील स्वत:च्या मालकीची जागा गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन बेकायदेशीरपणे स्वत:च्या नावावर लावून घेतलेली असताना ती जागा पुन्हा आपल्या नावावर होण्यासाठी राजमाता जिजाऊ जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर कौसाबाई मारोती सरोदे या महिलेने सोमवारी (दि.13 जानेवारी) नगरच्या तहसिल कार्यालया समोर उपोषण केले. या उपोषणात सूर्यभान सरोदे, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार सहभागी झाले होते.
स्वत:च्या नावावर असलेली नगर तालुक्यातील मौजे चिचोंडी पाटील येथे गट नंबर 1026 ही मिळकत होती. मात्र या हस्तलिखित 7/12 वर खाडाखोड करून सुधीर भद्रे यांनी तत्कालीन तलाठी व सर्कल यांच्या सहकार्याने स्वत:च्या नावावर करुन घेतली असल्याचा आरोप कौसाबाई सरोदे यांनी केला आहे.


या प्रकरणात भद्रे यांनी स्वतःच्या नावावर बेकायदेशीर 15.10 गुंठे क्षेत्र कुठलेही खरेदी खत न करता कौसाबाई सरोदे यांचे नाव कमी केले व स्वतःचे नाव लावले आहे. सदर व्यक्ती हे यापूर्वी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी साखर कारखाना संचालक, भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहे. त्यांची गावात मोठी दहशत आहे. आपल्या पदाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दडपण आणून, तत्कालीन चिचोंडी पाटील तलाठी व सर्कल यांना हाताशी धरुन ही जागा हडप केलेली आहे. या प्रकरणात वेळोवेळी पाठपुरावा करुनही संबंधितावर कारवाई केली जात नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


स्वत:च्या मालकीच्या 15.10 गुंठे क्षेत्रावर बेकायदेशीरपणे हस्तलिखित 7/12 वर खाडाखोड करून लावण्यात आलेले इतर व्यक्तीचे नाव हटवून स्वत:चे नाव लावून सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कौसाबाई सरोदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *