• Sat. Nov 1st, 2025

भिस्तबाग जिल्हा परिषदेत शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप

ByMirror

Apr 22, 2024

गुणवंत विद्यार्थ्यांचा स्टुडंट्स ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

पहिलीत आलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करुन वेदांत विकास नजन  व जय नागनाथ काजळकर यांना स्टुडंट्स ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


अद्यावत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या जिल्हा परिषद शाळेचे भौतिक सुविधांनी रुप पालटले असताना परिसरातील विद्यार्थ्यांचा ओढा शाळेकडे वाढला आहे. इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गुणवंत व स्टुडंट्स ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, योगिता वाघमारे, अहिल्या सांगळे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत करुन शाळेबद्दल मनोगत व्यक्त केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी इतर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तर शाळेसाठी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.


अनिता काळे म्हणाल्या की, मुलांना शाळेतून जीवनावश्‍यक शिक्षण मिळणे सर्वात महत्त्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणातून भारताचा सक्षम नागरिक घडणार आहे. शिक्षणाबरोबरच मुलांना संस्कार व महापुरुषांचे विचार रुजवणे आवश्‍यक आहे. त्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षक झटत असतात, शिक्षणाबरोबर कौशल्य निर्माण करण्याचा शिक्षकांचा प्रयत्न आहे.

उत्कृष्ट शिक्षक व त्यांना साथ देणारे पालक शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकतात. नेतृत्व संपन्न विद्यार्थी हि राष्ट्राची संपत्ती आहे. ज्ञानसागरातील राजहंस निर्माण करुन सक्षम पिढी घडविण्याचे कार्य जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन जय काजळकर व वेदांत नजन  यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *