ॲबट संकुलच्या विद्यार्थिनींनी जवानांना बांधल्या राख्या
जवानांच्या डोळ्यात तरळले भावनिक आश्रू
नगर (प्रतिनिधी)- आमचे कुटुंब लांब असते, त्यामुळे सण साजरे करता येत नाहीत. पण आज विद्यार्थ्यांनी बांधलेली राखी पाहून रक्षाबंधन साजरे झाले, असे प्रतिपादन गहिवरून आलेल्या कंठाने कर्नल विक्रम निखरा यांनी केले.
भिंगार येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशहा हायस्कूल आणि विश्वशंकर प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. आर्मर्ड स्टॅटिक स्टेशन, भिंगार येथे जावून विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधल्या. याप्रसंगी मेजर अवनीत तिवारी, गौरव प्रसाद सिंह सुभेदार, मेजर सौरभ चंद्रासिंग सुभेदार, मेजर शिवराज भोसले, सहाय्यक विभागीय अधिकारी तथा प्राचार्य प्रमोद तोरणे, विश्व शंकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण अनभुले, पर्यवेक्षिका कविता शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या इको फ्रेंडली राख्या जवानांना बांधून पेढा भरविला. आर्मड स्टॅटिक स्टेशनच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि शैक्षणिक भेटवस्तू देण्यात आल्या.
जवानांनी राखी बांधून घेतल्यानंतर चिमुकल्या मुलींचे स्नेहबंधन आणि कुटुंबियांच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले. राखी बांधल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. विद्यार्थिनींनी जवानांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. भारत माता की जय…, वंदे मातरम… घोषणा देत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांति घायतडक व संदीप यांनी केले.
आभार गणपत करवते यांनी मानले. प्राचार्य प्रमोद तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.