• Wed. Jan 28th, 2026

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त फिनिक्सचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर

ByMirror

Jun 27, 2024

38 गरजू ज्येष्ठ नागरिकांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये तब्बल 170 नागरिकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. तर 38 गरजू ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.


शिबिराचे उद्घाटन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. जालिंदर बोरुडे म्हणाले की, बहुजनांचा आधार व थोर लोकराजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होय. दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबविणारा खरा लोकनायक म्हणून त्यांनी कार्य केले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडविल्या. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करुन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्याचे विचार व कार्याच्या प्रेरणेने समाजात परिवर्तन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात नेत्र तपासणी करुन ज्येष्ठ नागरिकांची उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी गरजूंना अल्पदरात चष्म्यांचे आणि मोफत औषधाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *