• Wed. Oct 15th, 2025

एक्सलन्स अचिव्हर्सने पटकाविले अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे अजिंक्यपद

ByMirror

Nov 25, 2024

नमोह फुटबॉल क्लबचे स्पर्धा आयोजनाचे तीसरे पर्व; दिवस-रात्र रंगला फुटबॉलचा थरार

मुलींसाठी नगर अहिल्या चषक व मुलांसाठी नमोह युथ चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेची घोषणा

नगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर क्लबच्या मैदानावर रंगलेल्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे अजिंक्यपद एक्सलन्स अचिव्हर्स संघाने पटकाविले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे हे तीसरे पर्व होते.


अंतिम फेरीत दाखल झालेले एक्सलन्स अचिव्हर्स विरुध्द आरडीएक्स ज्युनियर या संघामध्ये अंतिम सामना रंगला होता. रात्रीच्या गुलाबी थंडीत मैदान फुटबॉलच्या रंगतदार सामन्याने तापले होते. या अटातटीच्या सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांना भिडले होते. दोन्ही संघाच्या आक्रमक खेळीनंतरही पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. दुसऱ्या हाफमध्ये एक्सलन्स अचिव्हर्स कडून वंश फिरोदिया यांनी केलेला 1 गोल संघाच्या विजयासाठी निर्णायक ठरला. 1-0 गोलने एक्सलन्स अचिव्हर्सने विजेतेपद पटकाविले. यावेळी विजेत्या संघातील खेळाडूंनी संगीताच्या तालावर ठेका धरत व फटाक्यांच्या आतषबाजीत मैदानात एकच जल्लोष केला.


पारितोषिक वितरणासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे कर्नल ओमपाल सिंग, खेलो इंडिया फुटबॉलचे संस्थापक सदस्य हितेश जोशी, क्रीडा प्रबोधिनी बालेवाडीचे फुटबॉल प्रशिक्षक धीरज मिश्रा, नमोह फुटबॉलच्या नमिता फिरोदिया, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सहसचिव गोपीचंद परदेशी यांच्या हस्ते विजयी, उपविजयी व उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस व चषक प्रदान करण्यात आले.


हितेश जोशी म्हणाले की, नगर शहराच्या ग्रासरुटमधून फुटबॉल खेळाडू पुढे येत आहे. नमोह फुटबॉल क्लबच्या योगदानाने या खेळाला चालना मिळाली आहे. तर या स्पर्धेतून खेळाडूंना स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळत आहे. फुटबॉल हे एक जग असून, जगाच्या पातळीवर हा खेळ खेळला जातो. यामध्ये करिअरच्या उत्तम संधी असल्या तरी खेळाडूंनी आपले करिअरचे इतर ध्येय देखील समोर ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. तर नाशिक येथे होणाऱ्या वेस्टर्न झोनलसाठी निवड झालेल्या शहरातील खेळाडूंची नावे जाहीर केली.


कर्नल ओमपाल सिंग यांनी जिकण्यापेक्षा स्पर्धेत उतरणे महत्त्वाचे असते. स्पर्धेतून आपल्यातील कौशल्य व शक्तीचे परीक्षण करुन पुढील वाटचाल ठरविता येते. निरोगी व सशक्त पिढीतून भारताचे उज्वल भविष्य घडणार असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी पितृभक्ती, गुरूभक्ती व देशभक्ती जीवनात श्रेष्ठ असल्याचे सांगितले. धीरज मिश्रा म्हणाले की, नगर मधील खेळाडू आपली गुणवत्ता सिध्द करत आहे. अनेक उत्कृष्ट खेळाडूंनी आपली मोहर राज्य स्पर्धेत उमटवली आहे. या मातीतला खेळाडू देशासाठी नक्कीच खेळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


नमिता फिरोदिया म्हणाल्या की, शहरात फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी नमोह फुटबॉल क्लबच्या माध्यमातून 50 पेक्षा अधिक स्पर्धा घेऊन अनेक प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे काम करण्यात आले आहे. तर यामध्ये सातत्य ठेऊन नवीन वर्षात अजून नवीन स्पर्धा घेतली जाणार असल्याचे सांगून, त्यांनी मुलींसाठी नगर अहिल्या चषक व मुलांसाठी नमोह युथ चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धांची घोषणा केली.


दोन दिवस-रात्र सलग फुटबॉल सुपर लीग स्पर्धेत फुटबॉलचे सामने रंगले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून वेदांत काळे, रनवीर म्हस्के, जैद शेख, सिध्दांत गांधी, साहिल कुसळकर, वीर छल्लाणी, आतीष उरमुडे, शुभंकर सावंत तसेच बेस्ट गोलकिपर- वंश छल्लाणी, बेस्ट डिपेन्डर- जसवीर ग्रोवर व टॉप गोल स्कोरर- वंश फिरोदिया यांना सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी आदित्य जाधव या खेळाडूने सादर केलेल्या फुटबॉलच्या कवायतीने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.


स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फुटबॉल संघ मालक संघ मालक दर्शन भंडारी (जीसी फायटर्स), सागर कायगावकर (एसजीके गोल्ड स्टार), जोएब खान (गुलमोहर चॅलेंजर्स), अभिनंदन भन्साळी (अवित्री वेलोसिटी किंग्स), प्रणिल मुनोत (कॉन्प्लेक्स सुपर हीरो), चेतन गांधी (गांधी वॉरीअर्स), ऋतविक वाबळे (आरडीएक्स ज्युनियर), आशिष तोट्टू (एक्सलन्स अचिव्हर्स) यांनी योगदान दिले. याप्रसंगी संघाचे प्रशिक्षक ऋषी पाटोळे, मयूर टेमक, प्रसाद पाटोळे, प्रणय रागिनवार, सिध्दार्थ चौहान, सौरभ चौहान, रोहन कुकरेजा, अक्षय बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिध्दार्थ वांद्रे व ऋतिक चौहान यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून जोनाथन जोसेफ, सोनिया दोसानी, सलमान शेख, सुयोग महागडे, अभय साळवे यांनी काम पाहिले.



नाशिक येथे होणाऱ्या वेस्टर्न झोनल फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या शहरातील खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे:- 17 वर्षा खालील मुले- नील देढवाल, वंश फिरोदिया, वीर छल्लाणी, पुष्कर डेरे, आतिश उरमुडे, साहील कुसळकर, 15 वर्षा खालील मुले- निरज धोका, निरज जगताप, स्वजीत खरात, आरुष पोपळघट, शुभंकर सावंत, वेदांत बनसोडे, अवधूत गायकवाड, 13 वर्षा खालील मुले -देवांश झरेकर, कृष्णा खांदवे, वेदांत बांगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *