• Thu. Mar 13th, 2025

श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना

ByMirror

Mar 1, 2025

माजी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

समर्थरत्नांनी संस्थेचे नाव उज्वल करावे -मुकुंद (काका) जाटदेवळेकर

नगर (प्रतिनिधी)- 56 वर्षांची वैभवशाली शिक्षणाची परंपरा लाभलेले श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ राज्यासाठी भूषणावह आहे. एका अर्थाने 56 पिढ्या घडवण्याचे काम आजपावेतो या शैक्षणिक संस्थेने केलेले आहे. या संस्थेतून बाहेर पडलेले विद्यार्थी आज जगाची, समाजाची सेवा करत आहेत. या सर्व समर्थरत्नांनी माजी विद्यार्थी संघामध्ये सहभागी होऊन या सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे नाव अजून मोठे व उज्वल करण्याचे आवाहन धर्मशास्त्र अभ्यासक मुकुंद (काका) जाटदेवळेकर महाराज यांनी केले.


दासनवमीनिमित्त आयोजित श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्याङ्घङ्घ समर्थरत्न या माजी विद्यार्थी संघाच्या बोधचिन्ह व फलकाचे अनावरण करताना जाटदेवळेकर महाराज बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा दासनवमी उत्सव समिती प्रमुख श्रीपाद कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, खजिनदार संजय कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य तथा माध्यमिक विभागाचे शालेय समिती चेअरमन ॲड.किशोर देशपांडे, कार्यकारणी सदस्य स्वप्निल कुलकर्णी, सौ. संध्या कुलकर्णी, संस्थेचे निमंत्रित सदस्य राहुल जोशी, श्रीमती स्वाती कुलकर्णी आदींसह सर्व शाखांचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक सुनील कानडे आदी उपस्थित होते.


समर्थरत्न माजी विद्यार्थी संघ समितीचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी विशद केले की, मंडळाच्या चारही प्रशालांचे माजी विद्यार्थी हे संस्थेसाठी समर्थरत्न आहेत. या संघामार्फत जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा मानस आहे. जगातील जवळजवळ सर्वच देशात समर्थचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. त्यांची माहिती संकलित करून माजी विद्यार्थी मेळावे, विशेषांक, स्मरणिका तयार करणे, यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणे आदी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.संस्थेच्या नव्या भव्य दिव्य नूतन समर्थ प्रशालेचे बांधकाम प्रगतीपथावर असताना या माजी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा, ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा आपली शैक्षणिक संस्था, शाळा व आताच्या विद्यार्थ्यांना व्हावा यातून विचारमंथन घडावे व शैक्षणिक चळवळ निर्माण व्हावी हा यामागील हेतू त्यांनी स्पष्ट केला.


या उपक्रमाची वेबसाईट, सोशल मीडिया पेजेस, युट्युब चॅनेल, हॅशटॅग, गुगल फॉर्म लिंक तयार करण्यात आल्या असून यासाठी तंत्रज्ञ ऋग्वेद कुलकर्णी हे काम बघत आहेत. मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, संगीता जोशी, वसुधा जोशी, अजय महाजन यांच्यासह शिक्षक डॉ.अमोल बागुल, शंकर निंबाळकर, अश्‍विनी जाधव, श्रद्धा देऊळगावकर, सुप्रिया डबीर व इतर शिक्षक सदस्य या समितीमध्ये काम पाहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *