गुणवत्तेच्या बळावर जिल्हा परिषद शाळांकडे वाढतं आकर्षण
इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांना निरोप, शैक्षणिक साहित्याचे वाटप
नगर (प्रतिनिधी)- गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्हा परिषद शाळा पुन्हा पालकांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरत असून, राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील अनापवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याचे उत्तम उदाहरण ठरली आहे. या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याचवेळी, इयत्ता चौथी उत्तीर्ण होऊन माध्यमिक शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही पार पडला. या दोन्ही प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सागर घोलप, गहिनीनाथ वायदंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पल्लवी संदीप सजन, चंद्रभान आवडाजी अनाप, अंगणवाडी सेविका अलका अनाप, ललिता धनवट, शकुंतला अनाप, शुभांगी अंत्रे, सुरेखा अनाप यांच्यासह अनेक ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक सागर घोलप म्हणाले की, अनापवाडी शाळेने शिक्षणाच्या माध्यमातून एक सकारात्मक आणि गुणात्मक वातावरण निर्माण केलं आहे. आज जेव्हा पालक आपल्या मुलांना खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळेत दाखल करत आहेत, तेव्हा तो आमच्या शिक्षकवर्गाच्या मेहनतीचा आणि शाळेतील चांगल्या संस्कारांचा विजय आहे. या शाळेचा हेतू केवळ पुस्तकी ज्ञान देणं नाही, तर मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणं आहे. पालक आणि ग्रामस्थांचा सहभाग हीच आमची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वायदंडे यांनी तर संयोजन शिक्षकवर्ग व व्यवस्थापन समितीने केले होते.