शिक्षकांच्या हातून देशाचे उज्वल भवितव्य घडणार -बाळासाहेब बुगे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक सेवाभावी वृत्तीने समाज घडविण्याचे कार्य करत आहे. त्यांच्या हातून देशाचे उज्वल भवितव्य घडणार असून, गुरु चांगला असेल तर विद्यार्थी देखील चांगले घडतात. पुस्तक हे खरे मित्र व जीवनात मार्गदर्शक ठरतात. मोबाईलमुळे वाचन संस्कृती लोप पावत असून, मुलांना ज्ञानसंपन्न करण्यासाठी वाचन संस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांनी विशेष उपक्रम राबविण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांनी केले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात शिक्षण सप्ताह उपक्रमाचा समारोप विविध उपक्रमांनी पार पडला. समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी बुगे बोलत होते. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, नामदेव फलके, भाऊसाहेब ठाणगे, गोरख चौरे, सुभाष जाधव, अतुल फलके, डॉ. विजय जाधव, अमोल वाबळे, मंदा साळवे, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे, तृप्ती वाघमारे, मयुरी जाधव आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह राबविण्यात आला. यामध्ये शाळेत विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तर पालकांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करुन पालकांना घरी वृक्षारोपणासाठी रोपांची भेट देण्यात आली. समारोप कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
शिक्षण सप्ताहात सक्रीय सहभाग नोंदवून विविध शाळेत जाऊन खेळाबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा शिक्षणाधिकारी बुगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.