• Wed. Jun 4th, 2025

केडगाव अंबिकानगर येथील ओढ्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे

ByMirror

Jun 2, 2025

स्थानिक लोकप्रतिनिधीने ओढा बुजविल्याचा आरोप; ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्याने केडगावात पूर स्थिती


केडगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन; चार दिवसांत कार्यवाही न झाल्यास आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलनाचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- मौजी केडगाव अंबिकानगर येथील सर्व्हे नंबर 511 व 512 मधील नैसर्गिक ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत तात्काळ कार्यवाही करून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याची मागणी केडगाव ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्रामस्थांनी सोमवारी (दि.2 जून) जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधीने सदर नैसर्गिक ओढा बुजवला असून, अनेकवेळा तक्रार करुनही महापालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात आला. नुकतेच झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होवून नागरिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. चार दिवसांत कार्यवाही न झाल्यास आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.


याप्रसंगी संदीप कोतकर युवा मंच अध्यक्ष भूषण गुंड, राजू लाळगे, पप्पू हुलगे, विलास हुलगे, सागर कोकणे, तन्मय रासने, राजू बोरगे, पप्पू मंत्री, आदिनाथ भोर, सुभाष लाळगे, सविता गाडगे, विमल कोकणी, प्रियांका शहाणे, कल्पना हजारे, सुनीता हुलगे, लक्ष्मी बोरगे, निशा बोरगे, उषा शिंदे, मीरा उदागे, अनिता पुंडलिक, ललिता पवार, अनिता खुरचेकर, पमा भोर, रागिणी शिंदे, आशा गवळी, गौरी लाळगे, ज्योती पवार, कांता पवार, मनीषा कोकणे, प्रभा साखरे, आश्‍विनी बोरगे, अश्‍विनी शहाणे आदींसह केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


केडगाव येथील सर्व्हे नंबर 511 च्या दक्षिणेकडून, सर्व्हे नंबर 508 च्या उत्तरेकडून आणि सर्व्हे नंबर 512 मधून नैसर्गिक ओढा वाहतो. हा ओढा नेप्ती गावाच्या हद्दीवरील डोंगर भागामधून उगम पावून पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. या ओढ्यावर पाझर तलाव देखील बांधलेला आहे. जो परिसरातील जलसाठा आणि भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त आहे.केडगावात नागरी वसती तयार झाली असून, त्याच्या सांडपाण्याचा निचरा थेट ओढ्यात केला जातो. या ओढ्याचा प्रवाह नैसर्गिक उतारामुळे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी आणि पावसाचे पाणी घेऊन जातो. या आधी देखील या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन घरात पाणी शिरण्याचे अनेक प्रसंग घडले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


मागील आठवड्यात शहर व परिसरात जोरदार मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे केडगाव परिसरात अचानक पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: अंबिका नगर भागातील ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे प्रवाह अडवला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर स्थिती निर्माण झाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, मालमत्तेचे नुकसान झाले व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


20 व 21 सप्टेंबर 2023 रोजी सर्व्हे नंबर 512 मधील काही धारकांनी नैसर्गिक ओढ्यावर भर टाकून त्यात अतिक्रमण केले. या अतिक्रमणामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाला. सर्व्हे नंबर 508 व 510 मधील प्लॉट धारकांनी याला विरोध देखील केला, परंतु सर्व्हे नंबर 511 व 512 चे धारक कोणतीही दखल घेत नाहीत. सदर परिसराचे बिनशेती करून प्लॉटिंगचे काम सुरू आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी या संदर्भात मनपा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु अद्यापही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.


हेमंत ढगे यांनी 2023 मध्ये केलेल्या तक्रारीनुसार महापालिकेने नगर-पुणे महामार्गावरील केडगाव नेप्ती रस्त्यालगत खलील गॅरेज शेजारी असणारा ओढा बुजवून ते गिळकृंत करण्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. ओढा बुजवून तेथे बंदिस्त ड्रेनेज लाईनचे पाईप टाकून काम पूर्ण केले असून, सदर ओढा बुजविला असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाहणी दरम्यान निदर्शनास आले. याप्रकरणी प्रभाग अधिकारी यांनी विजय पठारे व राजू पठारे यांना 29 मे 2024 रोजी संबंधित कागदपत्रे जमा करण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र यासंदर्भात देखील कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले.


सर्व्हे नंबर 511 व 512 मधील ओढ्यावर झालेले अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, ओढ्याचं नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा, सांडपाण्याची नियोजनबद्ध व्यवस्था करावी, ओढा बुजवून अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, पूरस्थिती व हानी झालेल्या नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केडगाव ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *