साळवे कुटुंबीयांवरील हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करुन पोलीस संरक्षण देण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर जामखेड तालुक्यातील नान्नज येथे जीवघेणा हल्ला झालेला असताना सर्व आरोपींना अटक करुन साळवे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी जामखेड येथे 5 ऑक्टोबर रोजी सर्व पक्षीय व संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
5 ऑक्टोबर रोजी सर्व पक्षीय व संघटनांच्या वतीने होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनार्थ रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडली. यावेळी रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्ह्याचे नेते अशोकराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय साळवे, सुमेध गायकवाड, डॉ. नन्नवरे, गणेश कदम, शिवाजी साळवे, बापू जावळे, सोनवणे, प्रा. जयंत गायकवाड, राज्य सचिव सुमेध क्षीरसागर, गायकवाड सर, संघराज गायकवाड आदी उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे दि.24 ऑगस्ट रात्री रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. तलवार, कोयते आणि काठ्यांनी सज्ज असलेल्या दहा-बारा गुंडांनी साळवे यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात महिलांसह सर्व कुटुंबीयांना गंभीर दुखापत झालेली आहे. या हल्ल्यातील सर्व आरोपीवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कार्यवाही करावी, पूर्वनियोजित कट करून जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला कलम 120 ब वाढीव कलम लावावे,सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, साळवे कुटुंबीयांना या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे, या कटातील मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.