अध्यक्षपदी खानसाहेब उस्मानमिया शेख, उपाध्यक्षपदी मेजर रउफ शेख व कार्याध्यक्षपदी हाजी आलम शफी खान यांची नियुक्ती
मुकुंदनगर हरित करण्यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षरोपण संवर्धनाची मोहिम राबविणार -खानसाहेब उस्मानमिया शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा उत्साहात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी खानसाहेब उस्मानमिया शेख, उपाध्यक्षपदी मेजर रउफ शेख व कार्याध्यक्षपदी हाजी आलम शफी खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

मुकुंदनगर येथे संघटनेचे जेष्ठ सदस्य ॲड. अन्वर शेख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाची सभा पार पडली. यावेळी संघटनेचे सचिव बशीर पठाण, सहसचिव फकीर मोहम्मद शेख, खजिनदार इस्माईल पठाण, हाजी बिलाल अहमद, मिर्झा नवेद, गोटू जहागीरदार, अब्दुल कादिर शेख, जी.एम. शेख, अब्दुल अजीज हैदर, ॲड. अनवर सय्यद, इकबाल सय्यद, हबीब शेख, आरिफ पटेल, नूर सय्यद आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीच्या सल्लागारपदी नूर सय्यद व हबीब पठाण, कार्यकारणी सदस्यपदी ईस्माइल शेख, इब्राहिम पठाण, सईद हाफिज व आरिफ पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
खानसाहेब उस्मानमिया शेख म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगर हरित करण्यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षरोपण संवर्धनाची मोहिम राबवणार आहे. तर नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेसाठी जागृती करणार आहे. मुकुंदनगर येथील ओपन स्पेस व मैदानाभोवती वृक्षरोपण मोहिम हाती घेतली आहे. तर कोरोना काळात ज्या महिला विधवा झाल्या त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी पाठबळ दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेजर रऊफ शेख म्हणाले की, मुकुंदनगर भागामध्ये ड्रेनेज, खड्डे व पाण्याची समस्या आहे. या समस्या सोडविण्यासाठी देखील ज्येष्ठ नागरिक संघाचा पाठपुरावा राहणार आहे. युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, या भागात गुटखाबंदी मोहिम राबविण्यासाठी देखील पुढाकार घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हाजी आलम शफी खान यांनी उपस्थितांचे आभार मानले.