सांस्कृतिक कार्यक्रमातून एक भारत श्रेष्ठ भारतचे दर्शन; देशातील थोर महापुरुषांच्या विचार व कार्याचा जागर
नगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आठवे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल 46 चे आर्मर्ड रेजिमेंटचे माणिक त्रेहान व पोदार संस्थेचे एचआर मॅनेजर बिपिन महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई जगताप, पोदार स्कूल वाघोलीचे मुनिश शर्मा, पोदार स्कूल रोहकलचे विशाल जाधव, पोदार स्कूल तळेगावचे सुधांशू नायक, पोदार स्कूल हडपसरचे ए. के. सिंग, पोदार स्कूल चाळीसगावचे घोरपडे, पोदार स्कूल शिरूरचे नीरज राय, गणेश इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज दापोलीचे महेंद्र काटकर, मातोश्री ग्लोबल स्कूल टाकळी ढोकेश्वरचे सत्तार शेख, बारामतीचे ॲड. राहुल बांदल आदींसह पोदार इंटरनॅशनल स्कूलचे अनेक प्राचार्य उपस्थित होते.
पालकांच्या सहयोगाने पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राथमिक विभागाचे एक भारत श्रेष्ठ भारत तर माध्यमिक विभागाचे या कमिंग अलाईव्ह संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. कार्यक्रमात वार्षिक अहवाल शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप आणि शाळेचे विविध विभागाचे विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सादर करून शाळेच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या सन 2023-2024 च्या विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
लेफ्टनंट कर्नल माणिक त्रेहान यांनी आपल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या आठवणी व अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे असलेले महत्त्व व पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या अनेक संस्थांमधून विद्यार्थ्यांना दिले जाणारे दर्जेदार शिक्षण याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. पोदार स्कूल विद्यार्थ्यांना देत असलेल्या शिक्षणातून अनेक विद्यार्थी हे देश सेवेसाठी तयार होऊन महाराष्ट्रामध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल अहिल्यानगरची छाप नक्कीच पडेल अशी आशा व्यक्त केली.
शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागाचे एक भारत श्रेष्ठ भारत तर माध्यमिक विभागाचे कमिंग अलाईव्ह या संकल्पनेवर आधारित संपूर्ण वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. यात प्राथमिक विभागामध्ये एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांचे महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, राजस्थान, काश्मीर अशा विविध प्रांतांची पद्धती, तेथील नृत्य यांचे प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता तिसरीतील आयुष जगताप, वीरा गांधी, इशिता बनकर तर चौथीतील अन्वी भोर या विद्यार्थ्यांनी केले. तर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमिंग अलाईव्ह या संकल्पने अंतर्गत महात्मा गांधी, झाशीची राणी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, मंगल पांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एअर होस्टेस नीरजा, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक थोर व्यक्तींचे विचार व त्यांनी दिलेली शिकवण यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
या स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी मानवतेच्या दृष्टिकोनातून आदर्श समाज कसा असावा, त्याचबरोबर सध्याच्या युगातील लोकांसमोर असलेल्या समस्या आणि त्यावर या महान पुरुषांनी केलेलं कार्य, दिलेली शिकवण तसेच भारतासमोरील सध्याच्या समस्या अशा अनेक विचारप्रवर्तक विषयावर आधारित कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमामध्ये विनोदी चुटकुले व नाटके सादर करून मुलानी कार्यक्रमाची रंगत वाढवली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कौतुक केले.
माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी सार्थक दौड, सिद्धी उरमुडे, बिनीश काझी, शर्वरी सांगळे, अथर्व बोठे यांनी केले. आभार शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी रिचा बिहानी हिने मानले. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शाळेच्या उपप्राचार्य शगुफ्ता काझी, शाळेचे सीनियर ऍडमिन ऑफिसर आशुतोष नामदेव, एडमिन ऑफिसर नितीन गावंडे, शाळेचे नृत्य शिक्षक गणेश ढेकळे, दिनेश ढेकळे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.