• Wed. Oct 15th, 2025

युवक-युवतींच्या करिअरला टेक-ऑफ देणारी ड्रोन कार्यशाळा शहरात उत्साहात

ByMirror

Apr 21, 2025

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शेतात ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक

ड्रोन उड्डाणापासून निर्मितीपर्यंत मिळणार प्रशिक्षण

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात आयोजित या एकदिवसीय कार्यशाळेला युवक, युवती, शिक्षक, पालक व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यशाळेचे उद्घाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सल्लागार सदस्य भूषण भंडारी, राजेश कुलकर्णी, ड्रोन मार्गदर्शक गणेश थोरात, मिहीर केदार, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, रुपीबाई बोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संदीप उबाळे, सेनापती बापट विद्यालय (पारनेर) मुख्याध्यापक संतोष कुलकर्णी, भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक रावसाहेब कासार, साईनाथ विद्यालय (शिर्डी) मुख्याध्यापक अभिमन्यू डुबल आदींसह युवक-विद्यार्थी व पालक वर्ग आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य मिळवले तर त्याच क्षेत्रात करिअर घडू शकते. ड्रोन हे केवळ छंद नसून उत्पन्नाचे साधन ठरू शकते. आधुनिक शेती आणि इतर क्षेत्रात ड्रोन काळाची गरज बनले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


गणेश थोरात यांनी सांगितले की, गावागावात ड्रोन पोहचविण्याची चळवळ सुरु आहे. विद्यार्थ्यांना ड्रोन बनवणे, त्याचे भाग, तांत्रिक बाबी आणि ड्रोन उडविण्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भूषण भंडारी यांनी प्रशिक्षणाचे नियम व कायदेशीर बाबी स्पष्ट करत सांगितले, ड्रोन प्रशिक्षण आणि अधिकृत लायसन्सशिवाय ड्रोन उडविणे नियमबाह्य आहे. त्यामुळे सर्वांनी अधिकृत प्रशिक्षणच घेणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यशाळेत उपस्थितांना ड्रोनच्या मूलभूत रचनेपासून ते त्याचे उड्डाण कसे करावे याचे सखोल प्रशिक्षण व्याख्यान व प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आले. विविध प्रकारच्या ड्रोनची माहिती देताना, त्यांच्या कृषी, औद्योगिक, आपत्कालीन सेवा, फिल्मनिर्मिती, सुरक्षा आणि नकाशे बनवणे अशा विविध उपयोगांवर प्रकाश टाकण्यात आला. फोन ड्रोन कॅमेरा, त्यातील व्हिडिओ क्षमता, लाईव्ह ट्रान्समिशन, अडथळे ओळखण्याचे तंत्रज्ञान याविषयीही तपशीलवार माहिती दिली गेली. कार्यशाळेच्या शेवटी ड्रोन उडविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तर शेतामध्ये औषध फवारणी करण्यासाठी वापरले जाणाऱ्या ड्रोनचे देखील उड्डाण करुन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मेघा जोशी यांनी केला. आभार गायत्री रायपेल्ली यांनी मानले. अधिक माहितीसाठी सोमनाथ नजान 8600009566 व संकेत क्षेत्रे 9881511366 यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *