जिल्हाधिकारी यांनी केले आरोग्य चळवळीचे कौतुक
शंभरपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी; गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया होणार
नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त समाज परिवर्तन संस्था व अहिल्यानगर महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, शंभरपेक्षा अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी पंकज आशिया व महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी समाजाची गरज ओळखून संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या आरोग्य चळवळीचे कौतुक केले. प्रास्ताविकात डॉ. भास्कर रणवरे यांनी सांगितले की, दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. निरोगी समाज निर्माण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असून, आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा आमचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी समाज परिवर्तन संस्थेचे संस्थापक संचालक प्रा. सदा पगारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिबिरात सेवा दिली. त्यामध्ये डॉ. आयेशा शेख, डॉ. भास्कर रणनवरे, डॉ. कल्पना रणनवरे, डॉ. अनुराधा इथापे यांचा समावेश होता. तसेच लॅब तंत्रज्ञ रोहन शेळके, मनोरमा थोरात, साळवे, डिके, पगारे, आल्हाट (सिस्टर), अनिकेत गायकवाड, प्रदीप वाघमारे, नोमुल, बाळासाहेब घुमरे शिबिरात सहभागी झाले होते.
शिबिरामध्ये 100 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर 50 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना नगर महानगरपालिका व जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार असून, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रकाश साळवे आणि आशिष साळवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.