• Thu. Oct 16th, 2025

कास्ट्राईब महासंघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ByMirror

Apr 15, 2025

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे दीन-दुबळ्यांना मिळाले आयुष्याचे खरे स्वातंत्र्य -एन.एम. पवळे

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नगर जिल्हा परिषद आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे, राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, उपमहासचिव निवृत्ती आरु, कार्यालयीन सचिव बाळासाहेब शिंदे, जिल्हा संघटक गणेश कदम, छानराज क्षेत्रे, विजया तरोटे, एस.एन. अल्हाट, दादासाहेब शिंदे, जी.के. भालेराव, निलेश आल्हाट आदी उपस्थित होते.


आज आम्ही ज्या समाजात स्वाभिमानाने जगतो, समानतेचा हक्क मागतो, तो हक्क कोणामुळे मिळाला याचा विचार आजच्या दिवशी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण मानवतेचे द्रष्टे महापुरूष होते, असे कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.


ते पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी शोषणाधारित समाजव्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी दीन, दलित व वंचित घटकांना केवळ आवाजच नाही, तर जगण्याचा आत्मसन्मानही दिला. बाबासाहेबांच्या संघर्षामुळे दीन-दुबळ्यांना आयुष्याचे खरे स्वातंत्र्य मिळाले.त्यांच्या अथक प्रयत्नातून भारताच्या घटनेत स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मूल्ये रूजली. आज आपण जी मूलभूत अधिकारांची फळे भोगतो, त्यामागे बाबासाहेबांचा खडतर प्रवास व बलिदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *