कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी नाना डोंगरे यांचे निस्वार्थपणे योगदान -माधवराव लामखडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका तालिम सेवा संघाच्या माध्यमातून नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा नगर तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष पै.नाना डोंगरे यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे व सामाजिक वनीकरण विभागाचे वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे यांनी सत्कार केला. तर निंबोडी (ता. नगर) येथील जय मल्हार कुस्ती केंद्राच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी यावेळी माजी नगरसेवक सुभाष बारस्कर, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, प्राचार्य सुभाष नरवडे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, युवा महाराष्ट्र केसरी पै. विष्णू खोसे, पै. भाऊसाहेब धावडे, पै. बाळू भापकर, पंच गणेश जाधव, शुभम जाधव, मल्हारी कांडेकर, समीर पटेल, रमाकांत दरेकर, मिलिंद थोरे आदींसह शालेय महिला कुस्तीपटू, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माधवराव लामखडे म्हणाले की, कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी नाना डोंगरे यांचे निस्वार्थपणे योगदान सुरु आहे. नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून नवीन मल्लांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ते करत आहे. नगरच्या मातीत खेळाडू घडविण्यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे यांनी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक करुन कुस्ती खेळाला चालना देण्याचे कार्य अभिनंदनीय असल्याचे सांगितले.
नगर-कल्याण महामार्ग, नेप्ती येथील अमरज्योत लॉनमध्ये दोन दिवसीय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डोंगरे यांनी विशेष योगदान देवून खेळाडूंची उत्तम सोय केली. दरवर्षी डोंगरे पुढाकार घेवून स्पर्धा यशस्वी करुन खेळाडूंना चालना देण्याचे कार्य करत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
