• Sat. Mar 15th, 2025

भिमा गौतमी मुलींच्या वस्तीगृहाला शैक्षणिक साहित्यासह अन्न-धान्याची मदत

ByMirror

Jul 28, 2024

बालभवनला साऊंड सिस्टीमची भेट; हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम

आजची मुले ही भविष्यातील समाजाचे भवितव्य -संजय सपकाळ

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवून सामाजिक योगदान देणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील ऊर्जा बालभवनला साऊंड सिस्टीम व गुलमोहर रोड येथील भिमा गौतमी विद्यार्थीनी आश्रम (वस्तीगृह) मधील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य, अन्न-धान्य व किराणा साहित्याची मदत देण्यात आली. गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, प्रफुल्ल मुळे, बजरंग दरक, जालिंदर बेल्हेकर, राजेंद्र चेंगडे, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, दिलीप गुगळे, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, अशोक पराते, अशोक लोंढे, अभिजीत सपकाळ, अविनाश पोतदार, राजू कांबळे, सुधीर कपाळे, विलास आहेर, शेषराव पालवे, संजय भिंगारदिवे, विठ्ठल राहिंज, सिताराम परदेशी, संतोष हजारे, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर अनावडे महाराज, दीपक बडदे, विठ्ठल राहिंज, अविनाश जाधव, अश्‍विन जामगावकर, रतन मेहेत्रे आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध प्रकारचे सहकार्य करुन प्रोत्साहन देण्यात येत आहे. आजची मुले ही भविष्यातील समाजाचे भवितव्य आहे. शिक्षणातून आपले उज्वल भवितव्य घडविण्याच्या दृष्टीकोनाने त्यांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. संघर्षातूनच मनुष्य घडत असतो. आपण कुठे आहोत? यापेक्षा भविष्यात कुठे जायचे आहे? या विचाराने व ध्येयाने प्रेरित होण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
सचिन चोपडा म्हणाले की, आर्थिक दुर्बल घटकातील मुली वसतिगृहात राहून शिक्षणाने आपले भवितव्य घडवित आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाने समाजाला दिशा दिली. आज विविध क्षेत्रात महिला आघाडीवर असून, मुलींनी उच्च शिक्षित होऊन आपले कर्तृत्व सिध्द करण्याचे त्यांनी सांगितले.


बालभवनच्या निलोफर शेख, गुलनाज सय्यद, आयेशा शेख, साजदा शेख, अंजुम शेख, शुभांगी विघावे, उषा खोल्लम यांनी हरदिनच्या सदस्यांचे स्वागत करुन बालभवनच्या साऊंड सिस्टीमचा स्विकार केला. या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रार्थना, लहान-मोठे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हरदिनच्या वतीने प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक असलेली गोष्ट तत्परतेने मिळत असल्याची भावना निलोफर शेख यांनी व्यक्त केली.


भीमा गौतमी वस्तीगृहाच्या अधीक्षिका रजनी जाधव यांनी भिंगारला वस्तीगृह असताना देखील हरदिन मॉर्निंग ग्रुपने मुलींसाठी सातत्याने मदत केली आहे. वस्तीगृहाचे स्थलांतर झाल्यानंतरही दरवर्षी विविध स्वरुपात मदतीचा ते पुढे करत असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *