पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा महिला आघाडीचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- अनेकांचे संसार उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या शहराच्या कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का? महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता! या आर्तहाकेने प्रश्न उपस्थित करुन शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. तर अवैध धंद्यांना अभय देणारे कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांची बदली करावी व कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने कोतवाली हद्दीत सुरु असलेले गांजा, हातभट्टी, मटका, जुगार, बिंगो, सोरट, मावा आदी अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करुन देखील संबंधित अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही.
कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. त्यावर पोलीस प्रशासन कोणतेही ठोस कारवाई करत नाही. अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढून अनेकांचे संसार आणि युवकांचे जीवन उध्वस्त होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अवैध धंद्यावाल्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने त्या धंद्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप महिला घाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार यांनी केला आहे. तर कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचे म्हंटले आहे.