कर्णबधीर विद्यार्थ्यांनां श्रवणयंत्राचे वाटप
पाल्यास असलेले दिव्यांगत्व स्विकारुन त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्या -देवीदास कोकाटे
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळदघाट, व जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी (दि.3 डिसेंबर) शहरातून दिव्यांग रॅली काढण्यात आली. दिव्यांगदिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
टिळक रोड येथील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयातून दिव्यांग रॅलीस जि.प. जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवीदास कोकाटे यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक अनाप, मुख्याध्यापक विजय आरोटे, पी.डी.कुलकर्णी, डॉ. मेरेकर, गिन्यानदेव जाधव, नितीन अवचर, मुख्याध्यापक योगेश आल्हाट, विजय बळीद, जगन्नाथ माने आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शालेय कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या क्रीडा, कला व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. देवीदास कोकाटे म्हणाले की, पाल्यास असलेले दिव्यांगत्व स्विकारुन पाल्याच्या प्रगतीकडे लक्ष देऊन त्याची शैक्षणीक प्रगती करावी. जे आहे ते स्विकारुन आव्हानाला सामोरे जा. समाज कल्याण विभाग व दिव्यांग शाळा नेहमीच आपल्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासन दिले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळदघाट यांनी कर्णबधीर विद्यार्थ्यांनां श्रवणयंत्राचे वाटप केले. अहिल्यानगर कर्णबधीर असोसिएसनचे अध्यक्ष आनंद कडुस, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, कवी सिकंदर शेख आदींसह शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक सुदाम चौधरी यांनी केले. आभार संजय राठोड यांनी मानले.
