20 वर्षाखालील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
तसेच फुटबॉल रेफ्री कोर्सचे आयोजन
नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या 20 वर्षाखालील मुलांच्या आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने जिल्हा संघ निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भुईकोट किल्ला मैदान येथे 15 मार्चपासून संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत होणाऱ्या निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिरामध्ये जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव रौनप फर्नांडिस यांनी केले आहे.
निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व खेळाडूंना सीआरएस नोंदणी करणे अनिवार्य आहे. सीआरएस नोंदणी करण्याकरिता आधार कार्ड आणि जन्म दाखला यांची मूळ प्रत फोटो आणि संमती पत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. 1 जानेवारी 2006 ते 31 डिसेंबर 2008 दरम्यान जन्मलेले मुले या निवड चाचणीत सहभागी होण्यास पात्र असतील. मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हिक्टर जोसेफ आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक सोनवणे हे जबाबदारी सांभाळणार आहेत. निवड झालेले खेळाडू हे 20 वर्षाखालील आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्य स्पर्धेमधील कामगिरी नुसार खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघासाठी निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच जिल्हा फुटबॉल संघटने मार्फत लवकरच फुटबॉल रेफ्री (पंच) कोर्सचे देखील आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणीसाठी 15 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. रेफ्री कोर्ससाठी वयोमर्यादा 14 ते 55 वर्षापर्यंत असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या केवळ 24 प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी 7709070169 या क्रमांकावर संपर्क करण्याचे म्हंटले आहे.