लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब व घर घर लंगर सेवेचा उपक्रम
जीवन समृध्द होण्यासाठी शिक्षणाची व त्यासोबत पर्यावरण संवर्धनाची गरज -डॉ. अनघा पारगावकर
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ अहमदनगर व घर घर लंगर सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने सारसनगर येथील कै. दामोदर विधाते (मास्तर) हायस्कूलमध्ये पन्नास मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याच्या किटसह स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमाप्रसंगी लायन्सच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, सचिव डॉ. सिमरन वधवा, खजिनदार अंजली कुलकर्णी, घर घर लंगर सेवाचे जनक आहुजा, कैलाश नवलानी, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के आदी उपस्थित होते.
डॉ. अनघा पारगावकर म्हणाल्या की, जीवन समृध्द होण्यासाठी शिक्षणाची व त्यासोबत पर्यावरण संवर्धनाची गरज आहे.
समाजातील मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शिक्षणाला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास त्यांचे भविष्य उज्वल राहणार आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न लायन्सच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सिमरन वधवा यांनी लायन्सच्या माध्यमातून फक्त समाजातील गरजूंना मदत करण्यापुरते मर्यादीत न राहता, सामाजिक बदलासाठी क्लबच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. यावर्षी मुलांचे शिक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमातंर्गत हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असलेल्या किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये दप्तर, चार नोटबुक व कंपासचा समावेश आहे. नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविलेल्या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी आभार मानले.