मासूम संस्थेचा उपक्रम
रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर मासूम संस्थेचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- नवविद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मुंबईच्या मासूम संस्थेमार्फत नवनीत 21 अपेक्षितचे प्रश्नसंचाचे मोफत वाटप करण्यात आले. दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक पांडुरंग गवळी, सहशिक्षक विलास शिंदे, देवका लबडे, विना कुऱ्हाडे, सुषमा धारूरकर, मासूम संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी महेंद्र म्हसे आदींसह आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व रात्रशाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक पांडुरंग गवळी म्हणाले की, मासूम संस्थेच्या माध्यमातून रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध उपक्रमातून प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. संस्थेच्या योगदानाने व शिक्षकांच्या परिश्रमाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढली असल्याचे स्पष्ट करुन, रात्रशाळेत विविध सोयी-सुविधा मिळताना त्याचा योग्य उपयोग करुन जीवनाचे ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.
मासूम संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी महेंद्र म्हसे यांनी रात्री शिक्षण घेणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना नवनीत 21 अपेक्षित उपयोगी पडत असल्याचे सांगितले. या उपक्रमास मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, संचालक कमलाकर माने व युवराज बोऱ्हाडे वरिष्ठ व्यवस्थापक गुरुप्रसाद पाटील, एस.एस.सी. विभाग प्रमुख शशिकांत गवस, निलेश ठोंबरे व रात्रशाळेत वर्षभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमास बजाज फिनसर्व्ह कंपनीचे सहकार्य मिळत आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
