विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य
शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याचा उमेद फाऊंडेशनचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याच्या उद्देशाने शैक्षणिक साहित्य व शालेय शूजचे वाटप करण्यात आले. आदिवासी कुटुंबातील मुलांना नवीन शैक्षणिक साहित्य व पायात नवीन शूज मिळाल्याने त्यांचा चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते.

राहुरी तालुक्यातील कारवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. कारवाडीच्या महिला सरपंच स्वातीताई कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, रामभाऊ सोळुंके, काशिनाथ पवार, संदीप मुंगसे, मच्छिंद्र रिंगे, राहुल पवार, कारवाडी प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक पटारे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जब्बार पठाण, प्रदीप तनपुरे, बाळासाहेब राऊत, अर्जुन वाणी, सुनील कपिले, मंदा शिंदे, बाळासाहेब बोंबले, कारंजकर संतन, उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुनाल तनपुरे, खजिनदार संजय निर्मळ, सदस्य नुरिल भोसले, विजय लोंढे, रवी साखरे आदी उपस्थित होते.
आदिवासी कुटुंबातील मुले अनवाणी पायी शाळेत जात असल्याचे व त्यांना शैक्षणिक साहित्य नसल्याने फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना वह्या, पेन्सिल व शालेय शूज उपलब्ध करुन देण्यात आले. सरपंच स्वातीताई कवडे म्हणाल्या की, उमेद फाऊंडेशनने दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबातील मुलांच्या जीवनात शिक्षण घेण्याची उमेद निर्माण केली आहे. उमेद फाऊंडेशनने सामाजिक जाणीव ठेऊन राहबिलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
नुरिल भोसले म्हणाले की, देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आदिवासी, मागासवर्गीय समाज प्रवाहात येण्यासाठी त्यांच्या मुलांना उच्च शिक्षित करण्याची गरज आहे. यासाठी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी, मागासवर्गीय गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्याचे कार्य सातत्याने सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुणाल तनपुरे यांनी फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप तनपुरे यांनी केले. आभार सुनील कपिल यांनी मानले.